ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हिडिओमुळे राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट, नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुरावा नसताना सोशल मीडियावर गरळ ओकणारा रविराज साबळे पोलिसांच्या कचाट्यात अडकणार?

प्रकाश महिपाळे

नांदेड : राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत अत्यंत बेजबाबदार, बदनामीकारक, अश्लील आणि चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या रविराज साबळे उर्फ आण्णासाहेब शेषनाथ साबळे यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डी.एन.ई.-१३६) जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भात युनियनने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील रहिवासी असलेले रविराज साबळे उर्फ आण्णासाहेब शेषनाथ साबळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संवर्गावर कोणताही ठोस पुरावा नसताना “राज्यातील सर्व २८,००० ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार होतो” असा सरसकट आणि गंभीर आरोप केला आहे.

एवढ्यावरच न थांबता, “ग्रामसेवक पदनाम बदलून ग्रामपंचायत अधिकारी केले, पण सेवक बनायचीही लायकी नाही” असे म्हणत “सर्वांची मुले लुळीपांगली होतील, मरतील”, “हरामखोर” अशा अत्यंत अशोभनीय, शापवजा आणि शिवीगाळ करणाऱ्या शब्दांचा वापर केल्याचा आरोप युनियनने केला आहे.

या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील हजारो प्रामाणिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का पोहोचला असून, समाजात त्यांची मोठी बदनामी झाली आहे. अशा प्रकारच्या बिनबुडाच्या विधानांमुळे शासकीय यंत्रणेबद्दल जनतेमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो आणि अधिकाऱ्यांविषयी समाजात द्वेष व वैमनस्य वाढण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत. संबंधित व्हिडिओ आणि डिजिटल पुराव्यांची तातडीने तपासणी करून, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत रविराज साबळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला हा बदनामीकारक व चिथावणीखोर व्हिडिओ त्वरित हटवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी.

या निवेदनासोबत संबंधित व्हिडिओची प्रत, लिंक आणि स्क्रीनशॉट देखील पुरावे म्हणून पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा नांदेडच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker