सगरोळीत येथे टिप्पर, दुचाकीची धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

अंकुशकुमार देगावकर
बिलोली : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील डेपो क्रमांक दोन वरून वाळू भरून निघालेल्या एका हायवा गाडीने देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावर सागरोळी बसस्टॉप जवळ एका मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. सदरची घटना दि. २६ मे रोजी सकाळी घडली.

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू डेपो क्रमांक दोनवरून वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना रविवार दि. २६ मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सगरोळी बसस्टॉप जवळ घडली आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सध्या दोन वाळू घाट डेपो चालू आहेत.

वाळू डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेले हायवा क्रमांक एम एच ०४ एफ.जे.९७०९ हे सगरोळी येथून देगलूर कडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी.एस.१६ इ.वाय. ८६७८ ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी वरील मोईन वजीरसाब शेख वय (३५ )राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वय (२५ )रा. सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

बिलोली तालुक्यात सध्या वाळू डेपोच्या नावाखाली शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत ठेकेदार मंडळी रात्रंदिवस अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागणी, येसगी सगरोळी येथील वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्याच्या नावाखाली वाळूचे उत्खनन करुन शासनाला चुना लावण्याचे काम होत आहे.