ग्रामीण भागातील महिलांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा ; जिल्हा परिषद नांदेडचा पुढाकार

प्रकाश महिपाळे
नांदेड :– ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण लक्षात घेता, जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत पातळीवर ‘एकदिवसीय मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण व समुपदेशन कार्यशाळा’ आयोजित करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या ३० जानेवारी २०२६ च्या ऐतिहासिक निर्णयानुसार, कलम २१ अंतर्गत ‘मासिक पाळी स्वच्छता’ हा आता मूलभूत अधिकार मानला गेला आहे. याच निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार, महिला व बालविकास विभागासाठी राखीव असलेल्या १०% निधीतून या कार्यशाळांचा खर्च केला जाणार आहे. सावित्रीबाई फुले ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत या प्रशिक्षणाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ग्रामीण महिलांच्या वैचारिक, भावनिक आणि आर्थिक विकासासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेने सर्व गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) पत्र पाठवले असून, सर्व ग्रामपंचायतींना नियमानुसार योग्य ती कार्यवाही कळवण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यशाळांमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.



