कुंडलवाडी पालिकेचा अजब कारभार: आरक्षित जागा सोडून खाजगी ले-आउटमध्ये ‘नमो उद्यान’चा घाट
माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार व नगरसेविका शितल मोमईवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; निविदा रद्द करण्याची मागणी

कुंडलवाडी : – कुंडलवाडी शहरात विकास आराखड्यानुसार उद्यानासाठी तीन स्वतंत्र जागा आरक्षित असतानाही, नगरपरिषदेने एका खाजगी ले-आउट धारकाच्या फायद्यासाठी ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणावरून शहरात राजकीय वातावरण तापले असून, माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका शितल मोमईवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
३ एप्रिल २०१२ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार कुंडलवाडी शहरात सर्व्हे नं. ५६९, ५७० आणि २४८ या तीन ठिकाणी उद्यानासाठी जागा आरक्षित आहेत. असे असतानाही, ६ एप्रिल रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व्हे नं. ३०८/१ या खाजगी ले-आउटमध्ये ‘नमो उद्यान’ उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, ही जागा साईनाथ उत्तरवार व इतरांच्या मालकीची असून, तिथे अद्याप लोकवस्तीही नाही.
- शासकीय निर्णयाला हरताळ: १७ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, ‘नमो उद्यान’ योजनेतील कामे केवळ सार्वजनिक मालकीच्या जागेवरच करणे बंधनकारक आहे.
- अधिनियमाचे उल्लंघन: खाजगी जागेवर शासकीय निधी खर्च करणे हे ‘महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५’ च्या कलम ५७ चे थेट उल्लंघन असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
- निधीचा गैरवापर: प्रशासक राजवटीत भाजप कार्यकर्त्यांच्या खाजगी ले-आउटमध्ये विकास निधीचा मोठा गैरवापर होत असल्याचा आरोप डॉ.कुडमुलवार यांनी केला आहे.
नगरपरिषदेने काढलेली ही निविदा तात्काळ रद्द करावी आणि शहराच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागेवरच उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच, खाजगी ले-आउट धारकांना शासकीय निधी उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“शासनाकडून शहराच्या विकासासाठी आलेला निधी खाजगी ले-आउटमध्ये वळवून त्याचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वीही अशा प्रकरणांच्या तक्रारी केल्या आहेत. ६ एप्रिलचा ठराव हा केवळ खाजगी मालकांच्या फायद्यासाठी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” -डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार (माजी उपनगराध्यक्ष, कुंडलवाडी)



