कुंडलवाडी शहरातील चुंगीनाका येथे पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारी कार पकडली
◆गुटखा पुरवठा करणाऱ्या बिलोली शहरातील गोडाऊनवरही धाड ◆ ६ लाख ३५ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ◆दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कुंडलवाडी :- राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील कुंडलवाडी शहर व परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. बिलोली शहराकडून कुंडलवाडी शहरातील चुंगीनाका येथे गुटख्याची वाहतूक ह़ोत असल्याची माहीती कुंंडलवाडी पोलीसांना मिळाल्यावरून पोलीसांच्या पथकाने कार पकडली. त्यानंतर गुटखा पुरवठा करणा-या गोडाऊनवर धाड टाकुन ६ लाख ३५ हजार ७१० रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला, कार व एक मोबाईल असा मुद्देमाल कुंडलवाडी पोलिसांनी जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई दि. १ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बिलोली शहरातून कुंडलवाडी मार्गै धर्माबाद शहराकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कुंडलवाडी पोलीसांनी दि.१ मार्च दुपारी १२:३० वाजता चुंगीनाका येथे कार क्र. एम एच ०५ एजे ८०९६ या गाडीस थांबवून तपासणी केली असता गुटखा व तंबाखूजन्य सुंगधित पदार्थ असा मुद्देमाल आढळून आला आहे.
हा गुटखा कुठून आला याबाबत अधिक चौकशी केली असता बिलोली शहरातील इनामदार गल्ली येथील व्यापारी फिरोज यांच्याकडून आणल्याचे कार चालकाने सांगितले.त्यानंतर कुंडलवाडी पोलीसांनी बिलोली शहरातील इनामदार गल्ली तील फिरोज यांच्या गोडाऊन वर छापा मारला.
दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत ६ लाख ३५ हजार ७१० रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला, कार एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख वाजिद मंजुर अहेमद (रा.कु़ंठा गल्ली, धर्माबाद) व अब्दुल फिरोज अब्दुल वहाब (इनामदार गल्ली, बिलोली) या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.