कुंडलवाडी येथे एसएसटी पथकाकडून २१ लाख ५० हजार रुपयांची रोकड पकडली
◆नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने रक्कम पकडल्याने खळबळ ◆ पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट

कुंडलवाडी :- कुंडलवाडी येथील चुंगी नाका येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यातच दि.१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एका कार मध्ये २१ लाख ५० रुपयांची रक्कम एसएसटी पथकाने पकडली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली आहे.

नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता काळात कुंडलवाडी शहरात येणारे प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याकरीता चुंगी नाका येथे एसएसटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दि.१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एसएसटी पथकाने बिलोली कडून कुंडलवाडी शहरा कडे येणारे कार क्र.एम एच २६ एके ७२४८ यास थांबवून चौकशी केली असता कारमध्ये २१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम एका लोखंडी पेटीमध्ये आढळून आली. सदरील रक्कम एसएसटी पथकाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान भेट दिली असून सदरील रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून या रकमेबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही रक्कम ट्रेझरी कार्यालयात जमा करण्यात येणार असून चौकशीनंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.
नायब तहसीलदार अनिल परळीकर, मुख्याधिकारी दीपक मोरे, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, यांनी घटनास्थळी भेट दिली. हि कारवाई एसएसटी पथकातील विशाल चंदापुरे, अभिजीत धुप्पे, निशिकांत अप्पाने, पोलीस कर्मचारी मिर्झा फैय्याज बेग यांनी केली



