शंकरनगर जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर जवळील पेट्रोल पंपाजवळ मोटार सायकल स्वारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भोपाळा तालुका नायगाव येथील राजकुमार माधवआप्पा स्वामी वय वर्षे 22 हा तरुण युवक जागीच ठार झाल्याची घटना दि. 20 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की भोपाळा तालुका नायगाव खै. येथील राजकुमार माधव आप्पा स्वामी वय वर्षे 22 हा नायगाव येथील महाविद्यालयात डी फार्मसी शिकत असलेला तरुण दि. 20 जुलै रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास भोपाळा येथुन शंकर नगर येथील दूध डेअरीला दूध देण्यासाठी म्हणून मोटार सायकल घेऊन जात असताना नांदेड देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात राजकुमार स्वामी यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्याचे समजताच भोपाळा येथील नागरिक घटनास्थळी धाव घेऊन राजकुमार स्वामी यांना नायगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांचा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे घोषित करून त्यांचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यांचा भोपाळा येथे शोकाकुल वातावरणात 21 जुलै रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या या अकाली निधनाबद्दल गावभर शोककळा पसरली आहे.
सदरील घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना समजल्या नंतर घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून रामतीर्थ पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.