जप्त केलेली बोट आणि सक्शन पंप स्फोटकाच्या सहाय्याने केली उध्वस्त
तहसीलदार गायकवाड यांच्या धाडसाचे होत आहे कौतूक

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बरबडा परिसरातील टाकळी येथील गोदावरी नदीपात्रातून दि. १९ रोजी जप्त केलेली महाकाय बोट व सक्शन पंप रविवारी सकाळी स्टोटक लावून उध्वस्त करण्यात आले. तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी राजकीय दबावाला बळी न पडता वाळू माफीयांचे कंबरडे मोडणारे धाडसी पाऊल उचलल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तर दुसरीकडे लोहा महसूल विभागाने मात्र काहीच कारवाई केली नसल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

लोहा तालुक्यातील वाळू माफीयांनी येळी महाटी भागातील गोदावरी नदीपात्रात वाळू शिल्लक ठेवली नसल्याने मागील काही दिवसापासून या माफीयांनी नायगाव तालुक्यातील बरबडा भागात हैदोस घातला होता. रात्रीच्या वेळी गोदापात्रातून सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करुन विक्री करत होते. त्यामुळे यापूर्वी दोन वेळा बोटी व सक्शन पंप जप्त करुन नष्ट केल्यानंतरही पुन्हा पुन्हा वाळूची चोरी करण्यात येत होती.

या प्रकाराला त्या भागाचे तलाठी व मंडळ अधिकारी माफीयांना बळ देत होते त्यामुळे वाळू माफीया मस्तवाल झाले आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी माफीयांना बळ देतांना तहसीलदारांना आंधारात ठेवण्यात येत होते. त्यामुळे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी समांतर यंत्रणा वापरुन कारवाई करत आहेत.

नायगाव तालुक्यातील बरबडा भागातील टाकळी येथील गोदावरी नदीपात्रातून सक्शन पंपाचा वापर करुन अवैध वाळू उत्खनन करुन महाकाय बोटीतून चोरीची वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी नायगाव व लोहा तहसीलदारांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी लोहा तहसीलदारांनी येळी महाटी परिसरात एक सक्शन पंप तर नायगाव तहसीलदारांनी एक महाकाय बोट व सक्शन पंप जप्त केले होते. जप्त केलेली यंत्रणा नायगाव तहसीलदारांनी रविवारी सकाळी स्फोटक लावून उध्वस्त करण्यात आली पण लोहा तहसीलदारांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी जप्त केलेली यंत्रणा नष्ट करण्यासाठी शनिवार पासून प्रयत्न करत होत्या पण रविवारी सकाळी त्यांना यश आले. या दरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या पण कोणाच्या दबावाखाली न येता रविवारी सकाळी धाडसी पाऊल उचलून यंत्रणा नष्ट करुन वाळू माफीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.
या कारवाईत नायब तहसीलदार कुलकर्णी, मंडळ अधिकारी, पवार, मंडळ आरु, तलाठी डाकेवाडी, तलाठी कार्लेकर, तलाठी येसेकर, तलाठी देशमुख, तलाठी तुडमे, तलाठी मुधळे चालक तुकाराम पुरी कोतवाल जाधव कोतवाल तिजारे यांनी सहकार्य केले.