दोन वर्षांपूर्वी मुलाचा आता बापाचा खुन : लोहा तालुक्यातील वाका येथील खळबळजनक घटना

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : लोहा तालुक्यातील वाका येथे बु़धवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान अल्पभूधारक शेतकरी किशन हरी खोसे ( ६५ ) यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने अत्यंत निर्दयपणे खुन केल्याची खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे २०२१ मयत किशन खोसे यांच्या मुलाचाही झोपेतच खुन करण्यात आला होता त्याचे मारेकरी अद्याप सापडले नसतांना पुन्हा बापाचा खुन करण्यात आल्याने या हत्याकांडामागील रहस्य उलगडण्याचे आव्हान पोलीसापुढे निर्माण झाले आहे.
दरम्यान या खुनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी घटनास्थळी भेट दिली. अबिनाश कुमार यांनी घटनेची माहिती घेवून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी दोन पथके गठीत केली असून ती पथके तपासकामी रवाना झाली आहेत.
वाका ता. लोहा येथीलवयोवृद्ध शेतकरी किशन हरी खोसे ( ६५ ) हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतआखाडयाकडे दूध काढण्यासाठी हातात स्टीलचा कॅन घेऊन पहाटे पाच वाजता घरून जात होते. याच दरम्यान गावापासून काही अंतरावर अज्ञात मारेकर्यांनी पाठीमागून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला.
या घटनेची माहिती गावात समजल्यावर एकच खळबळ उडाली आणि गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर अतिशय निर्दयपणे करण्यात आलेल्या खुनाच्या घटनेची माहिती उस्मानगर पोलिसांना कळवण्यात आली. माहिती समजताच ठाणे प्रमुख चंद्रकांत पवार, पीएसआय गजानन गाडेकर हे फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
वयोवृद्ध शेतकरी किशन खोसे यांचा खुन का करण्यात आला याचे कारण समोर आले तर नाहीच पण मयत खोसे यांचा मुलगा वशिष्ठ खोसे (२८) याचाही घराच्या अंगणात झोपलेल्या अवस्थेत अशाच पध्दतीने २०२१ मध्ये खुन करण्यात आला होता. त्याचबरोबर भाचा आनंद झोटलींग यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणातील आरोपी आजपर्यंत सापडले नाहीत. पोलिसांनी योग्य तपास न केल्याने आरोपी मोकाट सुटले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसरे हत्याकांड घडवले असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
खळबळ उडवून देणाऱ्या या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पंचनामा केला. श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबचे पथक आले, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आले ते दोनशे मिटर अंतरापर्यंत माग काढत काही ठिकाणी घुटमळला मात्र पुढे काहीही हाती लागले नाही.