कुंडलवाडी शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा ◆ शहरातील नायरा व हिंदुस्थान पेट्रोलियम वर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा
◆एच.पी.पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध असल्याने वाहनधारकांची मोठी गर्दी

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरात पेट्रोल -डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून दोन पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याने बंद झाले आहेत त्यातच बिलोली रोडवर असलेल्या एच.पी.पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने वाहनांची मोठी गर्दी होऊन मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दि.२३ मार्च रोजी सकाळपासूनच दिसून आले आहे.
कुंडलवाडी शहरात इंडियन ऑइल, एच.पी., नायरा व हिंदुस्थान पेट्रोलियम असे एकूण चार पेट्रोल पंप असून त्यापैकी हुनगुंदा रोडवर असलेले इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप अनेक महिनापासून सद्यस्थितीत बंद आहे. तसेच शहरात सुरू असलेल्या पेट्रोल पंपा पैकी हिंदुस्तान पेट्रोलियम व नायरा पेट्रोल पंप येतील पेट्रोल पंपाचा कंपनीकडून पुरवठा झाला.
नसल्याने सद्यस्थितीत बंद आहेत तसेच बिलोली रोडवर असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल उपलब्ध असल्याने दि.२३ मार्च रोजी सकाळपासूनच वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आलेः अनेकांनी पेट्रोल व डिझेल मिळणार नसल्याने वाहनांची टॅंक फुल केली आहे.
दरम्यान, सलग तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या येण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे अनेक पंप ‘ड्राय’ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी शहरात गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे नागरिकांनी ओंकार इंडियन गॅस कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे पोलीस बंदोबस्तात गॅसची वितरण करण्यात आले. याबाबत बिलोली तहसील चे पुरवठा अधिकारी सीमा मोहोड यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.



