शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने बिलोली तालुका अध्यक्ष बालाजी गेंदेवाड सर यांचा गौरव

सुभाष पेरकेवार
नरसी फाटा :- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बिलोली तालुका अध्यक्ष, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बालाजी लच्छागोड गेंदेवाड सर यांना त्यांच्या शैक्षणिक, वृक्षारोपण व संवर्धन तसेच सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शिक्षक सेनेचा राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या भव्य सोहळ्याचे आयोजन १० फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक सेना संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बालाजी गेंदेवाड सर यांना शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व शिक्षक आमदार आदरणीय श्री. ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या सोहळ्याला स्वागताध्यक्ष खासदार श्री. दि. ना. पाटील साहेब, माजी आमदार श्री. रमेश कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष श्री. विठूभाऊ चव्हाण सर, मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे सर, जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाटील अंबुलगेकर सर, जिल्हा पदाधिकारी श्री. अविनाश चिद्रावार यांसह राज्यभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बालाजी गेंदेवाड सर यांचा शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत मोलाचा वाटा आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.
‘सायकल चालवा, आरोग्य वाचवा’ हा संदेश देत आरोग्य आणि पर्यावरण जनजागृती केली, विविध शाळांमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मदत पुरवली आहे व समाजातील गोरगरीब कुटुंबांसाठी सतत मदतीचा हात पुढे केला.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शिक्षक सेनेच्या वतीने ‘शिक्षक सेनेचा राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गेंदेवाड सर यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण बिलोली तालुका, नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्रातील शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणखी व्यापक होईल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
“स्वतःसाठी तर सर्व जगतात, पण इतरांसाठी जगण्याचा आनंद काही औरच असतो,” या विचारांनुसार कार्य करणाऱ्या गेंदेवाड सरांचा हा सन्मान म्हणजे शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांची निस्वार्थ सेवा याला मिळालेली मोठी पावती आहे.