कोठाळ्यात नियम धाब्यावर बसवून पेव्हर ब्लाँकची कामे : पंचायत समितीचे कानावर हात आणि तोंडावर बोट

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॅकची तीन मिटर पेक्षा रुंदीची कामे करण्यात येवू नयेत असे मनरेगा आयुक्त नागपूर यांचे आदेश आहेत. पण नायगाव तालुक्यात हे आदेश धाब्यावर बसवून कामे होत असल्याने या नियमबाह्य कामांना कुणाचा पाठिंबा आहे अशी चर्चा होत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु तर आहेच पण कामे करतांना शासकीय नियम गुंडाळून कामे सुरु होती. त्यामुळे ६०.४० चा अनुपात पाळण्यात येत नव्हता परिणामी मनरेगा आयुक्त नागपूर यांनी नवीन कामे तर नकोच पण वर्क कोड दिलेली कामे सुरु न झाल्यास ती कामे करण्यात येवू नये असे आदेश ४ डिसेंबर २०२४ रोजी दिले होते तरीही नायगाव पंचायत समितीने तालुक्यात तब्बल २९ कामे सुरु केली. आदेश डावलून सुरु करण्यात आलेल्या कामांना गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंते, तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रम अधिकारी व रोजगार सेवक कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस येताच गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली असली तरी पेव्हर ब्लॅकची कामे नियम गुंडाळून करण्यात येत आहेत. मनरेगातून कुशल कामे करण्यासाठी ९०.१० या हेडखाली सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाँकची कामे करता येतात. मात्र या कामातही अनियमितता होत असल्याने मनरेगा आयुक्त नागपूर यांनी आक्टोबर २०२४ मध्ये तीन मिटर रुंद सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाँकच्या कामांना मंजुरी देवू नये व दिली असेल आणि काम सुरु झाले नसेल तर ते रद्द करण्यात यावे असे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात ग्रामपंचायत, गावातील मंदिरे, अंगणवाडी, शाळा, समाज मंदिर व मोकळ्या जागेत पेव्हर ब्लाँकची कामे केली जातात.
मनरेगा आयुक्तांच्या आदेशानंतर अशा प्रकारची कामे बंद होणे अपेक्षित असतांना अर्थिक तडजोडी करुन कामे सुरुच ठेवण्यात आली आहेत. नायगाव तालुक्यातील कोठाळा येथे तीन मिटर पेक्षा जास्त रुंदीची कामे करण्यात येत आहेत. याकडे लक्ष वेधले असता पंचायत समितीची यंत्रणा कानावर हात व तोंडावर बोट ठेवून बसली आहे. नियमबाह्य कामातून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अशा कामांना पाठींबा देण्यात येत आहे.