कुंडलवाडी पालिका मुख्याधिकाऱ्यांची २३ महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली ◆ दीपक मोरे यांनी पदभार स्वीकारला

कुंडलवाडी :- शहरातील नगरपालिकेवर नगरविकास विभागाने कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या नियुक्तीचे आदेश २० मार्च रोजी जारी करण्यात आले होते. त्यानुसार मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दि.२८ मार्च रोजी कुंडलवाडी नगरपालिकेचा पदभार स्वीकारला आहे. तब्बल २३ महिन्यांनंतर पालिकेला नियमित अधिकारी मिळाले आहेत.
कुंडलवाडी नगर परिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची ३१ मे २०२३ रोजी बदली झाल्यानंतर कुंडलवाडी नगर परिषदेत गत २३ महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाहीत. कधी महसूल विभागातील नायब तहसीलदाराकडे तर कधी धर्माबाद व देगलूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कुंडलवाडी नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याचे अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. लोकांच्या आरोग्य, बांधकाम व लोकहिताची कामे वेळेवर होत नसल्यानं संपूर्ण शहराच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे.
कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने काही किरकोळ कामे करण्यास सुध्दा विलंब होत होती. कोणत्याही शहराच्या विकासात तेथील अधिकाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अधिकारी नियमित असतील तर ते मनापासून कामही करतात आणि शहरास प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न करतात. कुंडलवाडी नगरपरिषदेला मागील २३ महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा होती, मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी पदभार स्विकारल्याने ती आता संपली आहे.
◆नूतन अधिकाऱ्यांपुढील आव्हाने कोणती?
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण, शहारातील वाहतूक कोंडी, पाकिंग व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट काढणे, कामकाजात पारदर्शकता आणणे, कर वसुली, मुख्य बाजारपेठेतील व्यापारी संकुलाचे गाळे भाड्याने देणे यासह विविध विकासकामांचे आव्हाने नूतन अधिकाऱ्यांसमोर असणार आहेत.