आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत इमारत निधीचा विषय गाजणार ; कपात करण्यात आलेल्या रक्कमेचे काय झाले ?

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत रंग भरत असून रंग भरत आहे तस पतसंस्थेत विद्यमान कारभाऱ्यांनी केलेल्या कारनाम्याचे पितळ उघडे पडत आहे. विम्याच्या नावाखाली कपात करण्यात आलेल्या रक्कमेची जिल्हाभर चर्चा झालेली असतांनाच आता इमारत निधीच्या नावाखाली जमा करण्यात आलेल्या लाखो रुपयाचे काय झाले असा प्रश्न मतदार उपस्थित करण्यात येत आहेत.
आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन्ही गटाच्या प्रचाराने वेग घेतला असला तरी परिवर्तन पॅनलने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. परिवर्तन पॅनलच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून सभासदामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी चौतीस वर्षांची सत्ता परिवर्तन करण्यासाठी सभासद उत्सुक आहेत. विद्यमान संचालक मंडळाने पतसंस्थेकडे जिल्हा परिषदेची नव्यानव वर्षासाठी लिजवर असलेली इमारत उपलब्ध असताना सभासदांकडून प्रती महिना एक हजार रुपये इमारत निधी जमा केला आहे. आजपर्यंत हा निधी सत्यानव लाख रुपये म्हणजेच जवळपास एक कोटी रुपये जमा झाला आहे. या इमारत निधीचा वापर कोण आणि कोणत्या कामासाठी करत आहेत याची सभासदांना काहीच माहिती नाही.
इमारत निधीच्या एक कोटी रुपयांचे घबाड कोणाच्या घशात आहे हा प्रश्न सभासदांकडून विचारला जात आहे. परिवर्तन पॅनल निवडुन आल्यावर इमारत निधीची कपात बंद करून सभासदांना दिलासा देण्याचे अभिवचन परिवर्तन पॅनलचे उमेदवार सभासदांना देत आहेत. यावेळी पतसंस्थेत परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन पॅनलने जंगजंग पछाडले आहे.