कुंडलवाडी पोलीस स्टेशन तर्फे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

कुंडलवाडी :- पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांच्या अंतर्गत पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता के रामलू मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष उपक्रमा अंतर्गत व धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांच्यातर्फे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आता ‘व्यसनमुक्त गाव मोहीम’ या संकल्पनेस अनुसरून व्यसनाधीनता – एक सामाजिक समस्या बनली आहे. व्यसन म्हणजे मानवी शरीराला आणि पर्यायाने मानवी आयुष्याला लागलेली एक कीड. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी काहीतरी थ्रिलर, जगावेगळं करण्याच्या अविर्भावात चुकीच्या संगतीमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत चाललीय आणि जीवावर बेतणाऱ्या या समस्येच्या परिणामांची पूर्ण कल्पना असूनही ‘कळतंय पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे डोळेझाक करुन सर्रास पणे व्यसनांच्या विषारी विळख्यात अलगदपणे ही पिढी सामावली जात आहे.
या महाभयंकर समस्येतून मुक्ती मिळावी आणि नवा विचार उदयास यावा यासाठी तालुक्यातील इयत्ता ७ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ” व्यसनमुक्ती- काळाची गरज या विषयावर मातृभाषेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिकासह आकर्षक करंडक व लेखकांच्या स्वाक्षरी सह पुस्तक भेट देण्यात येणार आहे. हि स्पर्धा विनाशुल्क आहे. तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी ८ आँक्टोबर पर्यंत नाव नोंदवावे. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.