अवैध वाळू उत्खननावर कठोर कारवाईचा महसूलमंत्र्यांचा इशारा
महसूल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई दंडासह फौजदारी गुन्हा दाखल होणार

New Bharat Times नेटवर्क
मुंबई : “अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर आता महसूल आणि पोलीस विभाग संयुक्तपणे कठोर कारवाई करणार आहे. यापुढे केवळ दंड आकारून वाहने सोडली जाणार नाहीत, तर फौजदारी गुन्हा दाखल होईल,” असे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सादर केले. अवैध वाळू उत्खनन, वापर आणि वाहतूक प्रकरणी महसूल आणि गृह विभागाने संयुक्त शासन निर्णय जारी केला असून, यामुळे वाळू माफियांना चाप बसणार आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदन देताना स्पष्ट केले की, यापूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडल्यानंतर केवळ महसूल विभाग दंड आकारून त्यांना सोडून देत असे. मात्र, नव्या शासन निर्णयानुसार आता अशी वाहने पकडल्यास महसूल आणि पोलीस विभाग दोन्ही स्वतंत्रपणे कारवाई करतील. “महसूल विभागाने वाहन पकडले तरी पोलिसांची कारवाई होईल आणि पोलिसांनी पकडले तरी महसूल विभाग कारवाई करेल. यामुळे दोन्ही विभागांचा दंड आकारला जाईल आणि फौजदारी गुन्हा दाखल होईल.”
या नव्या धोरणामुळे अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे सांगून बावनकुळे म्हणाले,” हा शासन निर्णय सर्वांना उपलब्ध करून दिला जाईल आणि याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल. वाळू माफियांना आता कोणतीही सवलत मिळणार नाही. पारदर्शक आणि कठोर कारवाईद्वारे सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि निसर्गाचे रक्षण होईल.” या निवेदनामुळे वाळू माफियांवर कठोर कारवाईची टांगती तलवार असून, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाने गौण खनिजांचे नियमन अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.