उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला : शासन निर्णयानुसार पहिली कारवाई नायगाव तालुक्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी चक्क बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ.क्रांती डोंबे या मैदानात उतरल्या असून. त्यांनी गुरुवारी अवैध वाळूची वाहतूक करणारी हायवा पकडली आहे. मंडळ अधिकारी रोहीदास पवार यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक आणि मालकाच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यात महसूलच्या पथकाला अपयश आल्याने बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ. क्रांती डोंबे या मैदानात उतरल्या असून. त्यांनी गुरुवारी नायगाव तालुक्यातील कोकलेगाव मार्गे कुंटूरकडे जात असताना चारवाडी फाट्यावर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान एम एच २६ बी.डी. ९१०९ या क्रमाकांची वाळू भरलेली हायवा समोरून येतांना दिसली.
थांबवून चालक साईनाथ विठ्ठल मोरे यास वाहतूक परवाना मागितला असता चालकाने नसल्याचे सांगितले. हायवातील वाळू कोठून भरलास अशी विचारणा केली असता हायवाचा मालक प्रभाकर येदुराज जाधव रा.सातेगाव यांच्या यांचे सांगण्यावरून मी ईळेगाव येथील गोदावरी नदी काठावरुन भरुन राजगडनगर येथे घेवुन जात आहे असे सांगितले.
हायवा चालकाजवळ कूठलाही वाहतूक परवाना नसल्याने सदरचा हायवा आणि ६ ब्रास काळी वाळू असा २२ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला. सदर प्रकरणात मंडळ अधिकारी रोहीदास पवार यांना प्राधिकृत करण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात चालक साईनाथ विठ्ठल मोरे व मालक प्रभाकर येदुराज जाधव रा.सातेगाव यांच्या विरोधात कलम ३०३(२),३(५) भारतीय न्याय संहिता व सह कलम ४८(७), (८) महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाळू व इतर गौण खनिजाची अवैध/अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीमध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुध्द फौजदारी कारवाई म्हणजेच एफ.आय.आर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनीच करावी. असा शासन निर्णय दि. १७ जुलै रोजीच महसूल विभागाकडून काढण्यात आला आणि या निर्णयाप्रमाणे नायगाव तालुक्यात बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ.क्रांती डोंबे यांनी पहीली कारवाई केली.