खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ : जनावरे खरेदी विक्रीचा व्यापार बेमुदत बंद कुरेशी समाजाचा निर्णय

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : परवानगी असणारे जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील कुरेशी समाजाला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसतांना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यामुळे (ता.१९) जुलै पासून जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कुरेशी समाज हा जनावरांचा व्यापार करतात पण जनावरांची खरेदी करुन दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत असताना वाहणे आडवण्यात येत असून जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा आरोप करुन खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. परवानगी असणाऱ्या जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील कुरेशी समाजाला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे असा आरोप बैठकीत करण्यात आला.
कायद्याने मान्यता प्राप्त जनावर आणली तरी नाहक त्रास होत असून जनावरे हे कतली साठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करण्यात येत आहे. जनावरे पोलीसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून गुन्हे दाखल करून वाहने व आदी साहित्य जप्त करण्यात येत आहे. त्यामुळे कुरेशी समाजावर नाहक होणारा त्रास लक्षात घेऊन समाजाच्या वतीने जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नायगाव तालुक्यातील कुरेशी समाजाची नुकतीच एक बैठक तालुकाध्यक्ष रिजवान कुरेशी यांच्या उपस्थित घेण्यात आली. यावेळी नांदेड चे अध्यक्ष अजीम कुरेशी, खलील कुरेशी ,फारूख कुरेशी, रउफ कुरेशी, गफुर कुरेशी, कुरेश कॉनफरंसचे अध्यक्ष अजीज कुरेशी, युसूफ कुरेशी, फैसल कुरेशी, उमर कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी (ता.१९) जुलै पासून बाजारात येणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्यामुळे आज गुरुवारच्या आठवडी बाजाराला फटका बसला. कुरेशी समाजाचे व्यापारी आठवड्यात बाजाराकडे फिरकले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेली जणावरे परत न्यावी लागली आहेत.