नायगाव तालुक्यातील 33 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची होणार पडताळणी : प्रस्थापित शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : जिल्हा परिषद शिक्षकांच्या २०२५ मधील सार्वजनिक बदल्यामध्ये विविध प्रकारचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र देवून नायगाव तालुक्यातील ३३ शिक्षकांनी बदलीतून सुट मिळवली किंवा सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतली. मात्र संवर्ग १ चा लाभ घेतलेल्या ३३ शिक्षकांची नावे तपासली असता यातील अनेक शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असण्याचीच शक्यता आहे. त्यावेळी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून. या शिक्षकांना मूळ वैद्यकीय प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी दि. २२ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक २०२५ च्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये संवर्ग १ मध्ये शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. संवर्ग १ मध्ये बदली होण्यासाठी किंवा बदलीतून सुट मिळवण्यासाठी या शिक्षकांनी दिव्यांगासह विविध प्रकारचे प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडली होती. संवर्ग१ मधील बदल्यात नायगाव तालुक्यातील ३३ शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. बदली अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या आधारावर बदलीतून सुट मिळवली किंवा सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतली. संवर्ग १ च्या बदली प्रक्रिया सुरु असतांनाच जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडून संवर्ग १ चा लाभ घेतल्याच्या तक्रारी झाल्या.
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव डॉ. तुकाराम मुंडे यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंडे यांच्या या पत्राने बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकात अक्षरशः खळबळ तर उडालीच पण पहील्या टप्यात पडताळणी झालेल्या बोगस प्रमाणपत्र धारक अनेक शिक्षकांच्या पोटात गोळा आला, तर कारवाईच्या धास्तीने अनेकांची बोबडी वळली. जेवढ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी झाली त्यापैकी १०२ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
पहील्या टप्यातील पडताळणी नंतर दि. २२ रोजी नायगाव तालुक्यातील ३३ शिक्षकांनी बदलीतून सूट मिळणे अथवा बदली करून घेणे यासाठी जे आवश्यक प्रमाणपत्र आणि कागदपत्र अथवा पुरावे जोडले आहेत व बदलीमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा शिक्षकांची व कागदपत्रांची व्यक्तिशः पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती कडून त्यांच्या मूळ वैद्यकीय प्रमाणपत्राची व आवश्यक पुराव्यां ची पडताळणी करण्यात येणार आहे.
विशेषतः ज्या शिक्षकांनी संवर्ग १ लाभ घेतला त्यांची नावाची यादी तपासली असता राजकीय वर्तूळात वावरणारे व धष्टपुष्ट असणारे आणि शाळेला दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे. काही शिक्षक तर राजकारणात वावरणारे आहेत अशा शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याने आश्चर्य वाटत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात महीला शिक्षकही मागे नाहीत काही महिला शिक्षकांनीही बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे.
संवर्ग १ मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची एप्रिल महिण्यात तालुकास्तरावर पडताळणी झाली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी अर्थिक तडजोडी करुन पडताळणी केल्याची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेषतः गटशिक्षणाधिकारी यांनीही संवर्ग १ चा लाभ घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.



