धाबे दणाणलेल्या नायगाव तालुक्यातील ‘त्या’ दिव्यांग शिक्षकांची पडताळणीनंतर उडाली झोप

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बोगस दिव्यांग शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु झाल्यानंतर नायगाव तालुक्यातील शिक्षकांचे धाबे दणाणले होते. दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेल्या या 33 शिक्षकांची दि. 22 रोजी पडताळणी झाली यावेळी बोगस दिव्यांग शिक्षकांनी अतिशय चांगली अँक्टींग करुन दिव्यांग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची अँक्टींग अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे पडताळणी दरम्यान अधिकाकाऱ्यांनी या दिव्यांगाचे कागदपत्रे जमा करुन घेतल्यानंतर दिव्यांग शिक्षकांची झोप उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या 2025 मधील सार्वजनिक बदल्यात शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन लाभ घेतला. यात जिल्ह्यातील तब्बल 700 च्या वर शिक्षकांनी संवर्ग एकचा लाभ घेतल्याची बाब उघडकीस आली. त्याचबरोबर दिव्यांग विभागाकडे अनेक तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव डॉ.तुकाराम मुंडे यांनी पडताळणी करण्याचे दि. 18 सप्टेंबर ला आदेश दिले होते. त्यानंतर तीन टप्यात दिव्यांगाचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आली.
नायगाव तालुक्यातील दिव्यांगाचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची दि. 22 सप्टेंबर रोजी पथक क्रमांक 1 ने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निजी कक्षात पडताळणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपण खरोखरच दिव्यांग असल्याचे चांगलीच अँक्टींग केली आणि तसे पडताळणी करणाऱ्या पथकाला दाखवण्याचाही चांगला प्रयत्न केला. मात्र या शिक्षकांचा बोगसपणा अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही परंतु पडताळणी पथकाने अतिशय सौजण्याने तपासणी करुन दिव्यांगाचे कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणत्रे जमा करुन घेत दिव्यांग शिक्षकांना मोकळे सोडले.
दिव्यांगाचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यास एक लाखाचा दंड व दोन वर्षाची सजा किंवा दंड व सजा अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संवर्ग एक मध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या शिक्षकांची चौकशी होणार या बातमीनेच पोटात गोळा उठला होता. विशेषतः असंख्य महिला शिक्षकांनी तर बोगसगिरीचा कळस केली होता त्यामुळे त्यांचे तर धाबे दणाणले होते.
पण अगोदर धाबे दणाणलेल्या शिक्षकांनी पडताळणी दरम्यान केलेली अँक्टींग याची जिल्हा परिषदेच्या वर्तूळात जोरदार चर्चा होत असतानाच केवळ कागदपत्रे जमा करुन घेवून सोडून देण्यात आल्याने पुढे काय होणार या धास्तीने बोगस दिव्यांग शिक्षकांची झोप उडाली आहे.
दोन माजी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांगाचा लाभ…
जिल्हा परिषदेने 31 मे 2025 रोजी प्राथमिक वास्तव्य सेवा जेष्ठता यादी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्या बदल्याची यादी जाहीर केली होती. त्या यादीत नायगाव येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदभार घेतलेल्या व घुंगराळा विस्तार अधिकारी असलेल्या एक महिला अधिकारी 41 टक्के तर कृष्णकुमार फटाले हे 42 टक्के अस्थिव्यंग असल्याचे दाखवले असून या दोघांनीही दिव्यांगाचा लाभ घेतला असल्याचे बोलल्या जात आहे.



