खऱ्या शिक्षकावर अन्याय केलेल्या तालुक्यातील ‘त्या’ बोगस दिव्यांगाचा जीव लागला टांगणीला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बोगस दिव्यांगाच्या प्रमाणपत्रावर नायगाव तालुक्यातील असंख्य शिक्षकांनी मोक्याच्या व सोईच्या ठिकाणी बदली करुन घेण्यात बाजी मारली होती. या बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या आणि प्रमाणिक शिक्षकावर आजपर्यंत अन्यायच झाला. मात्र आमचे काहीच होणार नाही या अविर्भावात असलेल्या तालुक्यातील 33 शिक्षकांची झाडाझडती सुरु झाल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नांदेड जिल्ह्यात बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत असून या टोळीने मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शिक्षकांना मिळवून दिले असून. या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर जिल्ह्यासह नायगाव तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्रावर हे पांढरपेशी मंडळी अतिशय मोक्याच्या ठिकाणी आजपर्यंत नियुक्ती मिळवली आहे. या बोगस दिव्यांग शिक्षकामुळे खऱ्या आणि प्रामाणिक शिक्षकांना कुठेतरी लांब बदली झाली असून हे बोगस दिव्यांग शिक्षक नांदेड शहराच्या आजुबाजुला, महामार्ग, तालुक्याच्या ठिकाणी बदली करुन घेतलेले आहेत.
अनेकवेळा बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेतलेले हे शिक्षक निर्ढावले असून आपले कुणीच काही करु शकत नाही. या अविर्भावत होते पण यंदा मात्र जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तक्रारीही झाल्या त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी व तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कागदपत्रासह संबधीत दिव्यांग शिक्षकांना बोलवले. त्यामुळे एकच खळबळ तर उडालीच पण आपले बिंग फुटणार या धास्तीने अनेकांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग शिक्षकांची चौकशी झाली असून दिव्यांग शिक्षकांचे कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांच्या समोर बोगस दिव्यांगानी चित्रपटात शोभेल अशी अँक्टींग केली पण ती अँक्टींग चौकशी अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. खऱ्या आणि प्रामाणिक शिक्षकावर या बोगस दिव्यांगांनी अन्याय केल्याची भावना सर्वत्र पसरली असून या चौकशीमुळे प्रामाणिक शिक्षक समाधान व्यक्त करत असून या बोगस दिव्यांगावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
चौकशीच्या वेळी नायगाव तालुक्यातील अनेक शिक्षकांनी उचापती करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे चौकशी पथकाकडे प्रमाणपत्रासह वैद्यकीय कागपत्रे जामा करावी लागली. कारवाईच्या धास्तीने दोप उडालेल्या शिक्षकांचा आता जीव टांगणीला लागला असून. बोगस दिव्यांग शिक्षकांचा जिल्हाभर होत असलेल्या फजितीची नागरिक मजा घेत आहेत.
मे महिन्यातील बदल्यातही बोगसगिरी…
मे महिण्यात जिल्हा परिषद अंतर्गत वित्त, जलसंधारण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक वगळून, महिला बाल कल्याण, आरोग्य, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामपंचायत विभातील जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यामध्येही कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्राचा लाभ घेतला असून. यात आरोग्य विभागातील अनेकांनी सोईच्या ठिकाणी बदली करुन घेणे किंवा बदली रद्द करण्यासाठी बोगस प्रमाणपत्राचा उपयोग केला असल्याने या बदल्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी समोर आली आहे.



