ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मुरुम माफीयावर बिलोली तहसीलदार मेहरबान : चिटमोगरा येथून बेफाम उत्खनन विक्री नायगाव तालुक्यात

New Bharat Times नेटवर्क

बिलोली : वादग्रस्त तहसीलदार गजानन शिंदे हे माफीयावर नेहमीच मेहरबान असतात. त्याचा प्रत्यय बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील मुरुम उत्खनन प्रकरणात पुन्हा एकदा दिसून आले. कारण नाममात्र परवानगी घेवून बेफाम व वारेमाप मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असल्याने शासनाचा दररोज लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात येत आहे.

बिलोली तहसील कार्यालय म्हणजे सध्या भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून वरिष्ठ अधिकारी तहसीलदार गजानन शिंदे यांना पाठीशी घालत असल्याने तेथे वाळू व मुरुम माफीयांचीच चलती आहे. दिवसभर तहसील कार्यालयाच्या परिसरात याच लोकांचा राबता असतो. वाळू व मुरुमाच्या अवैध धंद्यातून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने कार्यालयातील महत्वाची कामे मागेच राहत आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालय तळ मजल्यावर तर उपविभागीय अधिकारी कार्यालय पहिल्या मजल्यावर असताना गजानन शिंदे हे वरिष्ठांच्या नाकावर टिच्चून माफीयांची शाळा भरवत आहेत.

वाळूच्या गोरख धंद्यामुळे बदनाम झालेला तालुका आता मुरुमाच्या अवैध उत्खननामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. बिलोली तालुक्यातील गायरान जमीनीतून नाममात्र मुरुम उत्खननाची परवानगी घेवून पंचवीस हायवाच्या सहाय्याने सरळ नायगाव तालुक्यात मुरुम विक्री करण्यात येत आहे. बिलोली तालुक्यातील परवानगी घेवून नायगाव तालुक्यात मुरुमाची बेकायदेशीर विक्री करण्यात येत आहे. एवढ्या प्रचंड हायवा लावून मुरुमाचे बेफाम व वारेमाप उत्खनन करण्यात येत असल्याने याचा फटका आजुबाजूच्या शेतकऱ्यांना बसत आहे.

ठरवून दिलेल्या जागेत आणि नियमानुसार उत्खनन होत आहे का हे पाहण्याची जबाबदारी संबधीत तलाठ्यांची असताना ते फक्त मलिदा घेवून पसार झाले. बिलोली तहसीलदारांच्या या खाबुगिरीमुळे तालुक्यात वाळू व मुरुम माफीयांनी हैदोस घातला असून. यामुळे दररोज शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम होत आहे.

नायगाव तहसीलदारांची बेफिकिरी…
बिलोली तालुक्यात मुरुम उत्खननाची परवानगी घेवून नायगाव तालुक्यात मुरुमाची नियमबाह्य विक्री होत असल्याची माहिती नायगाव तहसीलदार सौ.धम्मप्रीया गायकवाड यांना असताना त्या या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे त्या शनिवारी व रविवारी नायगाव येथे राहतच नसल्याने माफीयांनी डोके वर काढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker