एक लाखाची लाच घेतांना विमानतळ ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक अडकला

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यास एक लाखाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस विभातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दि. 22 डिसेंबर रोजी एक तक्रार दाखल झाली. यात दि. 8 आक्टोबर 2025 रोजी तक्रारदाराचे पतीने पोलीस स्टेशन विमानतळ येथे दिलेल्या फिर्याद वरून तक्रारदाराचा भाऊ , आई व इतर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन विमानतळ येथे गुन्हा रजिस्टर नंबर 408/2025 कलम 109, 118(2),118(1), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3) व 190 भारतीय न्याय संहिता, 2023 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच दि. 12 आक्टोबर 2025 रोजी तक्रारदाराची सासू यांनी तक्रारदार हिचे वडील व आई या दोघा विरुद्ध दिलेल्या फिर्याद वरून पोलीस स्टेशन विमानतळ येथे गुन्हा रजिस्टर नंबर 501/ 25 कलम 316( 2), 318( 2), 318 (4), 3(5) भारतीय न्याय सहिता, 2023 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. नमूद दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्याकडे होता. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराचे भावावर दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयात लवकर दोषारोप दाखल करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये व तक्रारदाराची आई व वडिलांवर दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दिड लाख रुपये असे एकूण 3 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक करीम खान सालार खान पठाण, यांनी सदर तक्रारीची दि. 23 डिसेंबर रोजी तक्रारदाराची आई, वडील व भाऊ यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात लवकर दोषारोप दाखल करण्यासाठी ब्रह्मसिंग नगर, किंग कोब्रा बियर बारचे पाठीमागे तक्रारदार यांचे वडिलांच्या राहते घरी शासकीय पंचासमक्ष आरोपी लोकसेवक क्र.1 पोलीस उप निरीक्षक गोविंद जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रूपये स्वतः लाचेची मागणी केल्याचे व आरोपी लोकसेवक क्र. 2 वैजनाथ तांबोळी पोलीस कॉन्स्टेबल यांनी गुन्ह्यास अपप्रेरणा (प्रोत्साहन) दिल्याचे लाच मागणी पडताळणी केली.
त्यानंतर त्याच दिवशी दि. 23 डिसेंबर रोजी पोलीस उप निरीक्षक गोविंद जाधव यांनी ब्रह्मसिंग नगर, किंग कोब्रा बियर बारचे पाठीमागे तक्रारदार यांचे वडिलांच्या राहते घरी तक्रारदार यांचेकडून शासकीय पंचासमक्ष 1 लाख रूपये लाच रक्कम स्वतः स्विकारली आहे. त्याक्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.



