खुन करून मृतदेह फारीत बांधून बंधाऱ्यात टाकल्याची धक्कादायक घटना

New Bharat Times नेटवर्क
ईस्लापूर : एकाचा खुन करुन प्रेत गाठोड्यात बांधून सहस्त्रकुंड जवळील कोल्हापूरी बंधाऱ्यात टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दि. 9 जानेवारी रोजी उघडकीस आली. मुरली येथील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. बिटरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून प्रेत गाठोड्यातून बाहेर काढले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. सदरील इसमाचा आठ दिवसापूर्वी खुन करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून. मयताची ओळख पटवण्याबरोबरच खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलीसासमोर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्याच्या जवळ मुरली येथील गावकऱ्यांना शुक्रवारी दि. 9 रोजी बंधाऱ्याच्या गेट जवळ मेनकापडाच्या फारीत मृतदेह बांधल्याचे गावकऱ्यांना दिसला. अज्ञात इसमाचा मृतदेह गाठोडे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने येथील पोलीस पाटील मिथुन राठोड यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. असता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, बिटरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग शिंदे व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह असलेले गठोडे बाहेर काढल्यानंतर जाग्यावरच शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. शवविच्छेदनांनतर सदरील मृत इसम 35 वर्षाचा असल्याचा अंदाज असून त्याला आठ-दहा दिवसांपूर्वी मारून पाण्यात टाकल्याची शक्यता वर्तवली आहे.
सदरील इसमाच्या अंगावर पांढरी टी-शर्ट घातलेली असल्याचे आढळून आले. सदरील बंधाऱ्याजवळ इस्लापूर पोलीस स्टेशनचे सपोनी उमेश भोसले, आर के राठोड, होम डिड्डेवार नागरगोजे हे सुद्धा उपस्थित होते प्रेत हे पैनगंगा नदीच्या विदर्भाच्या बाजूने असल्याने सदरील घटनेचा पंचनामा बिटरगाव ता उमरखेड पोलिसांनी केला. मयत इसमाची ओळख पटवणे आणि त्याचा खुन का व कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास लावण्याचे बिटरगाव पोलीसासमोर आव्हान आहे.



