अर्जापुर शिवारातील जुगार अड्ड्यावर कुंडलवाडी पोलीसांची धाड ◆५ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
◆१ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अर्जापुर शिवारातील अर्जापुर ते कोंडलापुर रोड लगत पाणंद रस्त्यावर लपुन-छपुन सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंडलवाडी पोलिसांनी दि.२२ जानेवारी २०२६ रोजी सांयकाळी ६:३० वाजेच्या सुमारास धाड टाकत नगदी २३ हजार ६०० रुपये व ८० हजार रुपयांची मोटारसायकल व जुगाराच्या साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ५ आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडलवाडी पोलीसांना अर्जापुर शिवारातील अर्जापुर ते कोंडलापुर रोड लगत पाणंद रस्त्यावर लपुन-छपुन जुगार अड्डा सुरू असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर,
सहायक पोलिस उपनिरीक्षक गफुर शेख, पोलीस कर्मचारी आनंद बोडके, रघुवीरसिंह चौहाण, व्यंकट घोंगडे, ज्ञानेश्वर डाकेवाड, रामेश्वर पाटील यांनी अर्जापुर शिवारातील अर्जापुर ते कोंडलापुर रोड लगत पाणंद रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर दि.२२ जानेवारी २०२६ रोजी सांयकाळी ६:३० वाजता धाड मारली.
यावेळी रामचंद्र मोगलाजी जकले (रा.सुतार गल्ली,बिलोली), विनोद बाबुराव वाघमारे (रा.रविंद्र नगर,बिलोली), शेख आसिफ शेख अहेमद (देशमुख नगर,बिलोली), संतोष मनोहर नुग्रावार(रा.लोहार गल्ली, बिलोली) आणि राजु बसलिंग अप्पा स्वामी(रा.छोटी गल्ली, बिलोली) हे ५ जण अंदर-बाहर नावाचा जुगार पत्ते पैसे लावुन खेळत व खेळवित असताना कुंडलवाडी पोलिसांनी पकडले. या धाडीत नगदी २३ हजार ६०० रुपये व ८० हजार रुपयांची मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र मोगलाजी जकले, विनोद बाबुराव वाघमारे, शेख आसिफ शेख अहेमद, संतोष मनोहर नुग्रावार, राजु बसलिंग अप्पा स्वामी या ५ आरोपीविरुद्ध गु.र.नं.५/२०२६, कलम १२ (अ), महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गफुर शेख हे करीत आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



