धुप्पा येथे तालुका सेवाकेंद्राच्या वतीने भव्य हळदी-कुंकवाचा सोहळा विविध उपक्रमानी उत्साहात संपन्न

मोरे मनोहर
किनाळा :- जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने दि. २२ जानेवारी रोजी नायगाव तालुका सेवा समिती व धुप्पा सेवाकेंद्राच्या वतीने शेकडो महिलांच्या उपस्थिती भक्तिमय वातावरणात भव्य व दिव्य हळदी-कुंकवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी मराठवाडा पीठ महिला निरीक्षक सौ. संतोश्रीताई पाटील माऊलीकर, नांदेड जिल्हा संजीवनी प्रमुख पार्वतीताई जाधव, तेलंगणा पीठ धर्मक्षेत्र प्रमुख सौ.संगीताताई साखरे, माजी बालकल्याण सभापती निर्मलाताई मोहनराव पाटील धुप्पेकर, जनम प्रवचनकार गंगाधर कोकणे, संगीत गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संतसंग सेवा केंद्र धुप्पा महात्मा बसवेश्वर नगर येथून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पवृष्टीसह मंगलमय आगमन करण्यात आले. त्यानंतर यजमान सुधाकर दरेगावे व अनिल जांभळे या दोन्ही जोडप्यांच्या हस्ते धुपारती संपन्न झाली.
शेकडो महिला व पुरुषांनी मृदंग व टाळांच्या ठेक्यावर गणी गण गणात बोते या नामगजरात तल्लीन होऊन पावले खेळत जवळपास दोन तास भक्तीमय वातावरणात नाम सप्ताह संपन्न झाला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुमारे सातशे महिलांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी पंधरा दिवसाच्या दरम्यान भारतात हजारो रक्तदान शिबीर घेण्यात आले होते या मध्ये जवळ पास १ लाख ७१ हजार रक्तदात्यांनी प्रतक्ष रक्तदान केले यात नायगाव तालुक्यातील महिला व पुरुष अनेक महिलांनी रक्तदान केले त्याचांही सन्मान करण्यात आला.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.छायाताई मोहनदास पाटील म्हणाले की महिलांनी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ताजा व सकस आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे यासह आरोग्य विषयक मौल्यवान मार्गदर्शन केले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना जीवनदान मिळाले असून, त्याचबरोबर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सुख-समाधान नांदत आहे यासह संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी सभापती निर्मलाताई धुप्पेकर यांनी केले.
संतांच्या संगतीत राहिल्यास जीवन सफल होते आणि भक्तीमार्गानेच परमात्मा प्राप्त होतो असे जनम प्रवचनकार सौ निताताई संतोष महामुनी यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच नायगाव तालुक्यातील संतसंग अध्यक्ष, भक्त-साधक, शिष्य, महिला सेना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतसंग सेवा केंद्र, धुप्पा ता.नायगाव येथील सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.



