घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न सुटला : मात्र श्रेय कुणाचे यावरुन दोन नेत्यांचे कार्यकर्ते भिडले
अंकुशकुमार देगावकर
नायगांव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे मागच्या पाच महिण्यापासून रखडलेले अनुदान चार दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र भाजप कार्यकर्ते याचे श्रेय आ. राजेश पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांना देत असल्याने समाजमाध्यमातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले आहेत. त्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईची नायगाव तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.
नायगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागातील कंत्राटी अभियंते व आँपरेटर लाभार्थ्यांकडून लाच घेतात याबाबत आ. राजेश पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. यावरून जिल्हा परिषदेने चौकशी अंती (ता.२९) आक्टोबर २०२५ रोजी नऊ अभियंते आणि दोन कॉम्प्युटर ऑपरेटर यांना बडतर्फ करण्यात आले. आमदार राजेश पवार यांच्या या कारवाईचे जिल्हाभरात कौतुक झाले. त्यानंतर घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न सुटेल असे वाटत होते. मात्र उलट अडचणी वाढल्या.
नव्याने रुजू झालेले ऑपरेटर ‘नेटवर्क नाही उद्या या’ अशा उडवाउडवीच्या उत्तरांमुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला. परिणामी घरकुलाचे कामकाज ठप्प झाले. विशेष म्हणजे विविध योजनांतील सुमारे २१ हजार नवीन घरकुल मंजूर झाले. त्यापैकी जवळपास ५ हजार घरकुलधारकांना पहिला हप्ता जमा झाला असुन बाकी थकीत हप्ते जमा होत नव्हते. त्यामुळे लाभार्थी आ. राजेश पवार यांच्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या असा आरोप करत होते.
सदरच्या प्रकाराबद्दल असंख्य लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांच्याकडे कैफियत मांडली. त्यामुळे होटाळकर लाभार्थ्यांसह पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आठ दिवसात घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. होटाळकरांनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर आ. राजेश पवार यांनीही एक बेठक घेवून तत्काळ अनुदान जमा करण्याच्या सुचना दिल्या. दोन्ही नेत्यांच्या प्रयत्न मागच्या चार पाच दिवसापासून अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
अनुदान जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर आ. राजेश पवार व शिवराज होटाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याच नेत्यांच्या प्रयत्नामुळे घरकुलाचा प्रश्न सुटल्याचा दावा समाजमाध्यमातून करत आहेत. एवढेच नाही तर काहीजण आक्रमक भुमिका घेत एकदुसऱ्याच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करत आहेत. त्यामुळे या श्रेयवादावरुन कार्यकर्तेच एकमेकांच्या विरोधात भिडले असल्याने या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



