निवडणुका लांबल्या : जानेवारी ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर येणार प्रशासक

प्रकाश महिपाळे
नायगाव : तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याऐवजी शासन चक्क प्रशासक नेमणार असून. उच्च न्यायलयातील याचिकेचा संदर्भ देवून प्रशासक नियुक्त करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. 23 रोजी पत्र काढले आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद व महानगरपालिके नंतर आता ग्रामपंचायतीचा कारभारही प्रशासकाच्या हाती जाणार आहे.

नायगाव तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८० ग्रामपंचायतीच्या मुदत संपणार आहेत. विशेषतः जानेवारी ते मार्च या तीन महिण्यातच ९० टक्के ग्रामपंचायतीच्या मुदती संपणार असल्याने गाव कारभाऱ्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. पण निवडणूक आयोगाकडून कुठलीच तयारी करण्यात आली नसल्याने विद्यमान सरपंचानाच मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र राज्यात ग्रामविकास विभागाने दि. 23 जानेवारी रोजी काढलेल्या पत्राने विद्यमान सरपंचांना धक्का बसला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र पाठवले असून यात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी संदर्भाधीन जनहित याचिकेवरील सुनावणीअंती पारित केलेल्या दि. 14 ऑगष्ट, 2020 रोजीच्या आदेशात मुदत संपलेल्या तथा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर “प्रशासक” नियुक्तीबाबत अनुमती दिलेली आहे.
उच्च न्यायालयाचे सदरहू आदेश विचारात घेवून, माहे जानेवारी ते माहे डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींवर नियमानुसार निवडणूक होऊन, ग्रामपंचायत अस्तित्यात येईपर्यंत, नियमानुसार “प्रशासक” नियुक्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तरीच सदरहू, कार्यवाही करताना मा.उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी अशाही सुचना दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यात अंमलबजावणी होणार असल्याने आता सरपंचाऐवजी ग्राम पंचायत अधिकारीच कारभारी होतील.



