बिलोलीत रेती माफियांचा थाट, प्रशासनाची साथ २४८५ ब्रास परवानगी आड लाखो ब्रासचा उपसा…

अभिजित महाजन
बिलोली : प्रशासनाकडून केवळ २४८५ ब्रास रेती उत्खननाची परवानगी असताना सगरोळी (ता. बिलोली) येथील मांजरा नदीपात्रात कित्येक पटीने बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संपूर्ण गावाच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विहरीच्या अत्यंत जवळ दिवस-रात्र नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे.

प्रशासनाने नदीपात्रात उत्खननासाठी निश्चित करून दिलेली जागा सोडून इतर ठिकाणी सर्रास उत्खनन सुरू आहे. प्रत्यक्षात केवळ २४८५ ब्रास परवानगी असताना दिवस व रात्र मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यांमध्ये रेती वाहतुकीसाठी मोठ्या अवजड वाहनांची सगरोळीत सतत ये-जा सुरू असून, या वाहनांच्या रांगा लागल्याने सार्वजनिक वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नदीपात्राच्या बाहेर, रस्त्यावर तसेच सगरोळी परिसरात फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, थार, लँड रोव्हर यांसारख्या महागड्या वाहनांची गर्दी वाढली असून, यामुळे रेती माफियांची दहशत अधिक ठळकपणे जाणवत आहे.
सगरोळी गावास पाणीपुरवठा करणारी विहीर नदीपात्रात असून, त्याच विहिरीतून सगरोळीतील सुमारे १५ हजार नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या विहिरीच्या अगदी नजीकच सुरू असलेल्या उत्खननामुळे भविष्यात पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे उत्खनन त्वरित बंद करण्यात यावे, अशी ठाम मागणी होत आहे.
सगरोळी परिसरात रेतीचे प्रचंड साठे तयार करून नदीपात्रातील रेतीची खुलेआम वाहतूक सुरू आहे. हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडत असतानाही महसूल व पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या बेकायदेशीर उत्खननाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी व रेती उत्खनन बंद करावे, अशी मागणी मांजरा बचाव समितीतर्फे करण्यात आली आहे.



