आ.राजेश पवार आक्रमक ; दांडीबहाद्दर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला दस्ती, टोपी फुलांचा हार…

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव तहसील व पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराचा सोमवारी आ.राजेश पवारांनी चक्क पंचनामा केला. आक्रमक झालेल्या आमदाराने तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला दस्ती टोपी व हार घालत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर चक्क गेटवरच खुर्ची घालून बसले व लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गेटवरच झाडाझडती घेवून कडक शब्दात तंबी दिली आणि कुंकू लावून गुलाब पुष्प देवून सत्कार करत गांधीगिरी केली.

पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी सोमवारी आ.राजेश पवार हे आले होते. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान आल्यानंतर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतापलेले आमदार आक्रमक होत त्यांनी सुरुवातीला तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समितीमधील कक्ष अधिकारी यांच्या खुर्चीला दस्ती, टोपी व हार घालत संताप व्यक्त केला. आमदार आक्रमक झाल्याची माहिती तहसील व पंचायत समितीमधील कर्मचारी एकदुसऱ्याला तत्काळ देण्यास सुरुवात केली होती. तोपर्यंत आ.पवार हे तहसीलच्या गेटवरच आपल्या कार्यकर्त्यासह ठाण मांडले.

आमदार आल्याची माहिती समजताच एक एक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होवू लागले. लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येताच त्यांना धारेवर धरत झाडाझडती घेतली, त्यांना वेळेच बंधन पाळण्याचा दम भरला यानंतर वेळेच बंधन न पाळल्यास गाठ माझ्याशी असल्याची तंबी दिली. आमदार पवार यांनी अचानक तहसील व पंचायत समितीला भेट देवून घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे तहसीलदारासह गटविकास अधिकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर तर आलाच पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झोंबणारी ठरली.
तहसीलदारांची सकाळी रजा दुपारी हजर…
आ.पवार हे तहसील कार्यालयात येवून तहसीलदार, दोन नायब तहसीलदारांच्या खुर्चीला हार घातल्याची माहिती मिळाल्यानंतर नायगाव शहरात आलेल्या तहसीलदार सौ. धम्मप्रीया गायकवाड यांनी उगीच किरकिर नको म्हणून रजा पाठवली होती पण आमदार जाताच दुपारी कार्यालयात हजर झाल्या.



