अतिरिक्त पदभार देण्यासाठी एकाच तारखेत दोन आदेश : प्रशासकीय गोंधळाची जोरदार चर्चा

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगावच्या तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड या 38 दिवसाच्या बालसंगोपन रजेवर सोमवारपासून जात आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार अगोदर कंधार तहसीलदारांना देण्यात आला होता. मात्र दुपारी यात बदल करत विकास बिरादार यांचेकडे सोपवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या प्रशासकीय गोंधळाची नायगाव तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.

कुठल्याही पदाचा अतिरिक्त पदभार कुणाला द्यावा किंवा देवू नये हा सर्वस्वी त्या त्या विभागाच अधिकार असला तरी त्या विभागात पदभार देण्यावरून उडालेल्या गोंधळाची मात्र चर्चा होणार असून. नायगाव तहसीलदार यांचा अतिरिक्त पदभार देण्यावरून दोन वेगवेगळे आदेश निघाल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. नायगावच्या तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड या मुलीच्या शैक्षणिक कारणास्तव दि. 9 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 38 दिवस बालसंगोपन रजेवर जात आहेत.

त्यामुळे या पदाचा पदभार स्थानिक नायब तहसीलदार यांच्याकडे देणे अभिप्रेत असताना दुसऱ्या तालुक्यातील तहसीलदारांना अतिरिक्त पदभार देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन झाले. त्यामुळे बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्या दि. 30 जानेवारीच्या पत्राचा संदर्भ देत अगोदर कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांचेकडे देण्याचे निश्चित झाले व सौ. गायकवाड या रजेवरुन परत येईपर्यंत त्याच्याकडे पदभार असेल असा आदेश दि. 5 फेब्रुवारी रोजी निघाला.
गोरे यांच्या निघालेल्या आदेशानुसार ते अतिरिक्त पदभार घेतील अशी चर्चा नायगाव तहसील कार्यालयात सुरु होती. परंतु दुपारच्या नंतर मात्र पहीला आदेश रद्द झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य विभागात कार्यरत असलेल्या विकास बिरादार यांच्याकडे नायगावचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. दोनदा निघालेल्या आदेशामुळे नायगाव तालुक्यात प्रशासन गोंधळाची तर चर्चा होत आहे.



