पोलीस स्टेशन मुख्यालय असलेल्या कुंटूरमध्ये ‘गुडगुडी’ जोमात ; पोलीस मात्र आर्थिक कोमात…

सय्यद जाफर
नायगांव :- तालुक्यात “गाव तिथे जत्रा आणि जत्रा तिथे गुडगुडी” हे जणू समीकरणच बनले आहे. मात्र हा पारंपरिक खेळ आता मनोरंजन न राहता भाविकांची सरळसरळ आर्थिक लूट करणारा प्रकार ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. पोलीस स्टेशनचे मुख्यालय असलेल्या कुंटूर येथील रामचंद्र महाराज यांच्या जत्रेत स्थानिक पोलिसांच्याच आशीर्वादाने हा “लुटारू गुडगुडीचा खेळ” मोठ्या जोमात सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे.
नायगांव तालुक्यात गांव तेथे जत्रा आणि जत्रा तेथे ‘लुटारू गुडगुडी’ या बेकायदेशीर खेळाविरोधात काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर कुंटूर पोलिसांनी हा प्रकार बंद केल्याचा आव आणला होता. मात्र प्रत्यक्षात तो फक्त देखावा होता. हे आता उघड झाले आहे. दि. ६ फेब्रुवारीपासून कुंटूर येथे रामचंद्र महाराज यात्रा भरवण्यात आली असून या यात्रेत पोलीस स्टेशनचे मुख्यालय असतानाच मंदिराच्या अगदी लगत हा गुडगुडीचा लुटारू खेळ पुन्हा जोमात सुरू आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या या गुडगुडीच्या खेळात दर्शनासाठी, नवस-फेडीसाठी व खरेदीसाठी आलेल्या भाविकांना खेळाच्या नावाखाली अडकवून हजारो रुपयांची लूट केली जात आहे. अनेक भाविक रिकाम्या हाताने आणि हताश मनाने घरी परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे हा खेळ मंदिर परिसरातच थाटण्यात आला असून त्यामुळे धार्मिक वातावरणाला गालबोट लागत आहे. कायद्याने जत्रांमध्ये जुगार, सट्टा स्वरूपाचे खेळ बंदीस्त असताना पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे ? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यापूर्वी या विषयावर आवाज उठल्यानंतर काही दिवस गुडगुडी बंद ठेवून पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणे यामागे आर्थिक देवाण – घेवाण तर नाही ना ? असा संशय बळावत आहे.
“पोलीस स्टेशन मुख्यालय असलेल्या गावात जर असा प्रकार सुरू असेल, तर इतर गावांची काय अवस्था ?” असा संतप्त सवालही जनतेतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून संबंधित गुडगुडी चालकांवर व त्यांना अभय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.



