वार्षिक तपासणी संपताच शहरासह नायगाव परिसरात पुन्हा मटका व फिरते जुगार अड्डे सुरु

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : येथील पोलीस ठाण्याची विशेष पोलीस महानिरीक्षक यांची वार्षिक तपासणी होती. त्यामुळे सुरु असलेल्या अवैध धंद्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचू नये यासाठी चार दिवस मटका व जुगार अड्डे बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र वार्षिक तपासणी संपताच नायगाव शहरासह परिसरात मटका व फिरते जुगार अड्डे सुरु झाल्याने नागरिकांना लुटण्याचा गोरखधंदा सुरु झाला आहे.
अतिशय निष्क्रिय कामगिरी असलेले पोलीस निरीक्षक मारकड यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भोकर येथून उचलबांगडी करुन नायगाव पोलीस ठाणे देण्यात आले. येथेही त्यांची कामगिरीत काहीही फरक पडला नाही. अवैध वाळू, मुरुम सर्रास सुरु आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी आजपर्यंत अवैध वाळू किंवा मुरुमाची एकही कारवाई केली नाही दुसरीकडे बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी हायप्रोफाईल जुगार अड्ड्यासह अवैध वाळू वाहतूक करणारे वाहणे पकडली आहे. परंतु नायगावचे ठाणेदार फक्त नियमितपणे वसुली करण्याच्या पुढे काहीही करत नाहीत.
पोलीस निरिक्षण मारकड यांच्या निष्क्रियतेमुळे पोलीस ठाण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. खाकी वर्दीचा कुणालाही धाक राहीला नाही कुणीही किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात असताना ते फक्त बघ्याची भुमिका घेतात. मागच्या काही दिवसापासून नायगाव परिसरात फिरते जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
रातोळी, बेटकबिलोली, मुस्तापूर, खैरगाव, अंचोलीसह अन्य परिसरात शेतांच्या आखाड्यावर, पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डे सुरु झाले आहेत. या जुगार अड्ड्याबाबत नायगाव पोलीस आम्हाला काहीच माहिती नाही असे छातीठोकपणे सांगतात पण जुगार अड्डे चालवणाऱ्यांचा नेहमी ठाण्यात वावर असतो. ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासल्यास वास्तव समोर येईल.
सुरु झालेल्या फिरत्या जुगार अड्ड्याची व मटक्याची चर्चा रंगत असतांनाच विशेष पोलीस महानिरीक्षकांची वार्षिक तपासणी लागली. अधिकाऱ्यांच्या समोर पंचनामा नको म्हणून चार पाच दिवसासाठी हे धंदे बंद करण्याच्या संबधीतांना कडक सुचना दिल्या होत्या. त्यामुळे हे सर्व धंदे चार पाच दिवस बंद होते परंतु दोन तीन दिवसापासून पुर्ववत सुरु झाली आहेत.



