सगरोळी वाळू उपसा प्रकरण: ‘कार्यक्षम’ प्रतिमेला तडे; आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रकाश महिपाळे
नांदेड :- सगरोळी आणि गंजगाव वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (IG) विशेष पथकाने धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर, बिलोली उपविभागातील पोलीस प्रशासनाचे ‘वाळू प्रेम’ आता चव्हाट्यावर आले आहे. या कारवाईने उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) शाम पानेगावकर यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंत्रणेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
सगरोळी घाटावर ज्या पद्धतीने ८ जेसीबी आणि ३६ हायवा रात्रंदिवस गरजत होत्या, त्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. पोलीस उपमहानिरीक्षकांना माहिती मिळते, मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभागीय कार्यालयाला याचा सुगावा लागत नाही, ही बाब पानेगावकरांच्या ‘मौना’मागील गौडबंगाल स्पष्ट करणारी आहे. या भागात वाळू माफियांचा हैदोस रोखण्याऐवजी त्यांना मूक संमती दिली गेली का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पोलीस निरीक्षकांवर गाजली कुऱ्हाड, मग वरिष्ठांना अभय का?
काही महिन्यांपूर्वी सावळी रोडवरील जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी ‘सुपरवायझरी ऑफिसर’ म्हणून शाम पानेगावकर यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नव्हती.
आता तर वाळू घाटावरील कारवाईने पोलीस दलाची प्रतिमा राज्यभर मलीन झाली आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षा आणि वरिष्ठांना अभय, असा दुजाभाव का? अशी चर्चा पोलीस वर्तुळातच दबक्या आवाजात सुरू आहे.



