नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’ ; गॅस दरवाढीवरून ६ एप्रिलला नांदेडमध्ये वंचितची गर्जना

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकारविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, या प्रश्नावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’ असा जाब विचारण्यासाठी येत्या ६ एप्रिल २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. गेल्या काही काळात एल.पी.जी. सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने केवळ गृहिणींचे बजेटच कोलमडले नाही, तर छोट्या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या ‘जनविरोधी’ धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने कंबर कसली आहे. युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात प्रामुख्याने: रेस्टॉरंट आणि भोजनालय चालक, वसतिगृह चालक, छोटे हॉटेल व्यावसायिक, घरगुती गॅस वापरकर्ते (महिला वर्ग), एल.पी.जी.वर चालणारे रिक्षा चालक.
आंदोलनाची वेळ आणि ठिकाण
दिनांक: ६ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
“सामान्य माणसाच्या जगण्याचा अधिकार महागाईने हिरावून घेतला आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आणि वाढलेले गॅसचे दर कमी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि पीडित जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित राहावे,” असे आवाहन दीपक गजभारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



