ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेडमध्ये गुन्हेगारीचा कळस; ७० तासांत ५ खून, ‘वंचित’ आक्रमक; पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून कायद्याचा धाक उरला नसल्याचे चित्र असून, गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. अवघ्या ७० तासांत ५ खुनाच्या घटना समोर आल्याने शहर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि शहरात सर्रास फिरणाऱ्या काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

​शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या नांदेड शहरात नीट (NEET), जेईई (JEE) सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी येतात. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गँगवारमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर आणि शैक्षणिक प्रतिमेवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काळ्या काचांच्या वाहनांचा उच्छाद

​शहरात रात्री ९:३० नंतर काळ्या फिल्म (Black Film) लावलेल्या चारचाकी वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोटार वाहन कायदा १९८८ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकारे काळी फिल्म लावणे बेकायदेशीर असूनही, पोलीस प्रशासनासमोरून ही वाहने बिनदिक्कतपणे जात आहेत. या वाहनांतूनच गुन्हेगारी कारवायांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचा इशारा

​वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि.राज अटकौरे आणि शंकर महाजन यांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

  • ​काळ्या काचा असलेल्या वाहनांवर तत्काळ विशेष मोहीम राबवून जप्तीची कारवाई करावी.
  • ​शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करून मुख्य आरोपींना अटक करावी.
  • ​जेलमधून चालणारे गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करावे.
  • ​रात्रीच्या वेळी कडक नाकाबंदी आणि पोलीस गस्त वाढवावी.
  • ​अवैध गुटखा, वाळू तस्करी आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालावी.

“शहरातील कायदा व सुव्यवस्था तत्काळ न सुधारल्यास, व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाविरोधात भव्य विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker