कुंडलवाडी सोसायटीच्या विकासासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची चेअरमन सुनील बेजगमवार, माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वांगीण विकासाचे विकासासाठी व सोसायटीसाठी येणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शिरूर ताजबंद येथे चेअरमन सुनील बेजगमवार, माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या शिष्टमंडळाने दि.२ मे रोजी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोसायटीच्या सर्वांगीण विकासासह सोसायटीच्या आणि अडचणी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
कुंडलवाडी येथील संस्थेच्या जुन्या गोदामाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासकीय मंजुरी देण्यात यावी व “सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना” अथवा बळकटीकरण उपक्रमांतर्गत आवश्यक अनुदान मंजूर करण्यात यावे. संस्थेच्या १९ गावांच्या कार्यक्षेत्रातील माचनूर, शेलगाव, पाटोदा, अर्जापूर व हरणाळी या गावांमध्ये ग्रामीण शेतकयांच्या सोयीसाठी छोटी उपगोदामे (Sub-Godowns) उभारण्यासाठी शासकीय अनुदान व मंजुरी देण्यात यावी.
कार्यक्षेत्रातील १९ गावांतील शेतकरी सदस्यांना स्थानिक पातळीवर कृषी निविष्ठा, पीककर्ज व इतर सहकारी सेवा सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र” योजनेंतर्गत परबाना मिळवून देण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)” अंतर्गत संस्थेमार्फत शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापनेसाठी लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभागाने मार्गदर्शन व शिफारस करावी. आमच्या संस्थेतर्फे सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्प प्रस्तावाचा (DPR) सहकार विभागाने प्राथमिक विचार करून त्वरित मंजूरी द्यावी. अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी चेअरमन सुनील बेजगमवार, माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार, व्हाँईस चेअरमन गंगाधर नरावाडनगरसेवक प्रतिनिधी विलास दिवशीकर, माजी नगरसेवक श्रिनिवास जिठ्ठावार, माजी चेअरमन सयाराम नरावाड, माजी नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे, माजी नगरसेवक सुरेश कोंडावार, संचालक गणपत पाटील टेकाळे, संजय गंगोणे, दत्ता कोमुलवार, नरेश सब्बनवार, शिवाजी कोनेरवार(लहाण), माजी नगरसेवक पंढरी पुप्पलवार आदीजण उपस्थित होते.



