गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

नायगावच्या मातीतील हिरा चमकला! UPSC द्वारे सुशांत बोंडले यांची ‘आसिस्टंट कमांडंट’ पदी निवड

प्रकाश महिपाळे

नायगाव (विशेष बातमी): केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (CAPF) परीक्षेत नायगावचे भूमिपुत्र सुशांत सूर्यकांत बोंडले यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण नायगाव तालुक्याचा मान उंचावला आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत सुशांत यांनी यश मिळवत क्लास-१ (Group-A) मधील ‘आसिस्टंट कमांडंट’ (Assistant Commandant) या पदावर गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे नायगाव शहरासह ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुशांत बोंडले यांचा थक्क करणारा शैक्षणिक प्रवास: प्राथमिक शाळेपासून ते देशसेवेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत!

प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी): गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर येथे पायाभूत शिक्षणाची भक्कम सुरुवात केली. माध्यमिक शिक्षण (सातवी ते दहावी): केंब्रिज विद्यालय, नांदेड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करत अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवले. उच्च माध्यमिक शिक्षण (११ वी व १२ वी): महाराष्ट्रातील नामांकित फर्ग्युसन कॉलेज, पुणे (Fergusson College) येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण (B.Tech): देशातील नामांकित संस्था IIIT श्रीसिटी (चित्तूर, आंध्र प्रदेश) येथून संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) पदवी यशस्वीरीत्या संपादित केली. UPSC ची तयारी: अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुशांत यांनी देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून दिल्ली येथे जाऊन कठोर परिश्रम आणि अहोरात्र अभ्यास करत UPSC ची तयारी केली.


प्रशासकीय सेवेचा कौटुंबिक वारसा आणि कठोर परिश्रम… सुशांत हे नायगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुका सचिव सूर्यकांत जळबा बोंडले यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव आणि मार्गदर्शनातून प्रेरणा घेत सुशांत यांनी सुरुवातीपासूनच केंद्रीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास, अहोरात्र अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर त्यांनी पहिल्या टप्प्यापासूनच या परीक्षेत आपले वर्चस्व राखले.

देशसेवेसाठी ‘गॅझेटेड ऑफिसर’ म्हणून नियुक्ती…
UPSC ने जाहीर केलेल्या या अंतिम निकालात देशातील सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) या दलांमध्ये ३५० अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणाऱ्या या केंद्रीय दलांमध्ये सुशांत आता अधिकारी म्हणून देशसेवा बजावतील.

युवकांसाठी ठरले प्रेरणास्रोत…
ग्रामीण भागात राहून आणि योग्य नियोजनाच्या जोरावर UPSC सारखी देशपातळीवरील परीक्षा क्रॅक करता येते, हे सुशांत यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संघटना, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि नायगाव तालुक्यातील नागरिकांनी सुशांत बोंडले अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सुशांतने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण नायगाव तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्याचा गौरव आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्याच्या या यशापासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker