ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कुमार जीत आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला समता संकल्प सोशल फाऊंडेशनची मदत

सीमाताई आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचे वाटप ; बालग्राममधील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

आशा रणखांबे

पनवेल :- वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ आनंदोत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि वंचित घटकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा स्तुत्य उपक्रम समता संकल्प सोशल फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनी येथील पंचदीप संकुल, बालग्राम महाराष्ट्र या अनाथाश्रमात शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या राष्ट्रीय महिला नेत्या सीमाताई रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभया सोनवणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष आयु. उषाताई रामलू, समता संकल्प सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे, सेक्रेटरी सरिता वाडेकर, संचालिका प्रिया मोरे, बाबासाहेब डाके, श्रीकांत वाघमारे, विजय पवार, तुषार कांबळे, अक्षय अहिरे, सारीपुत्त सारनाथ आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत बालग्राममधील मुलांच्या भोजन व्यवस्थेसाठी कुकर, मिक्सर तसेच स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य संस्थेच्या वतीने भेट देण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व मुलांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. या मदतीमुळे बालग्राममधील मुलांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात बालग्राममधील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कलागुणांना उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी पंचदीप संकुल, बालग्राम पनवेलच्या अध्यक्षा मीनल टिपणीस आणि अधीक्षक डॉ. विनायक पाटील उपस्थित होते. तसेच सीमाताई आठवले यांच्या हस्ते गृह माता जयश्री बोते, संगीता गवळी, प्राजक्ता कुरणे, लक्ष्मी यादव आणि सोशल वर्कर पूनम पाटील यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सीमाताई आठवले यांनी बालग्रामच्या कार्याचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. बालग्रामला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समता संकल्प सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला आपले सहकार्य कायम राहील, असे आश्वासन दिले. संस्थेने यापुढेही अशाच प्रकारचे विधायक, समाजोपयोगी आणि मानवतेचा संदेश देणारे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सेक्रेटरी सरिता वाडेकर यांनी केले, तर संचालिका प्रिया मोरे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवर, बालग्रामचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

समाजातील वंचित, अनाथ आणि गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, त्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या गरजांना सहकार्याचा हात देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे यांनी सांगितले. सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित कार्य करण्याचा समता संकल्प सोशल फाऊंडेशनचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली ही मदत केवळ वस्तूंचे वाटप नसून अनाथ आणि गरजू मुलांच्या जीवनात आपलेपणाची भावना निर्माण करणारा माणुसकीचा सुंदर आविष्कार ठरला. वाढदिवसाचा आनंद सामाजिक संवेदनशीलतेशी जोडणारा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!