मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा सुरू होणार

प्रकाश महिपाळे
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ संदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. MahaDBT 2.0 पोर्टलवरील कार्यप्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा व अद्ययावतीकरण करण्यासाठी या योजनेची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली असून, ती दिनांक ३०/११/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
अर्ज नोंदणीबाबत स्पष्टीकरण: सर्व अर्जदारांना स्पष्ट करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत आजपर्यंत कोणत्याही अर्जदाराचा अर्ज अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलेला नाही किंवा पोर्टलच्या डेटाबेसमध्ये अर्जाची नोंद झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने यापूर्वी अर्ज सादर केल्याचा किंवा आधीच अर्ज करून लाभ घेतल्याचा प्रश्न उद्भवत नाही.
सर्व अर्जदारांना समान संधी: योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केल्यानंतर सर्व पात्र व इच्छुक अर्जदारांना एकाच अधिकृत प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करण्याची समान संधी उपलब्ध करून दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व नियमानुसार राबविण्यात येईल.
योजना पुन्हा सुरू होण्याची तारीख व वेळ: MahaDBT 2.0 पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज नोंदणी पुन्हा सुरू होणार असून, सर्व इच्छुक अर्जदारांनी या वेळेची नोंद घ्यावी.
अर्जदारांना आवाहन: कोणत्याही अफवांवर किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. योजनेबाबतची अधिकृत माहिती, अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख व वेळ तसेच पुढील सूचनांसाठी अर्जदारांनी MahaDBT 2.0 पोर्टलला नियमित भेट द्यावी. सर्व पात्र लाभार्थ्यांना समान संधी देण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, पोर्टलवरील तांत्रिक अद्ययावतीकरणानंतर इच्छुक पशुपालक व उद्योजकांनी निर्धारित वेळेत अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



