नायगाव तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालूक्यातील 80 ग्रामपंचायत मधील सन 2025 ते 2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन बिगर अनुसुचीत क्षेत्रात येणा-या सर्व ग्रामपंचायतीचा एकाच वेळी विचार करुन पुढील पाच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची प्रक्रिया दि. 25 एप्रिल रोजी दुपारी 03.00 वाजता तहसील कार्यालय नायगांव (खै.) येथे आयोजीत केली असल्यची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनियमानुसार, जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदांची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. २५) त्या-त्या तालुक्यांच्या मुख्यालयी सकाळी दहाला जाहीर करण्यात येणार आहे. ही सोडत ५ मार्च २०२५ पासून पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक अधिनियम १९६४ नुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या आरक्षणाची तालुकानिहाय अधिसूचना जारी केली.
नायगाव तालुक्यातील 80 ग्रामपंचायती पैकी अनु.जातीसाठी 17 ग्रामपंचायती आरक्षित असणार असून यातील 9 महिला सरपंच असतील तर अनु जमातीसाठी 4 ग्रामपंचायती असणार आहेत. इतर मागासवर्गीयासाठी 19 सरपंच पदे आरक्षित करण्यात येणार असून 10 महिला असतील तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 ग्रामपंचायती असणार आहेत त्या 20 महिला सरपंच होतील.
उद्या दि. 25 एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयात होणाऱ्या या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची माहिती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कळवण्याची जबाबदारी पंचायत समितीवर सोपवण्यात आली आहे.