“जातपात सोडा, शेतकरी म्हणून एक व्हा” – बच्चूभाऊ कडू यांचा एल्गार
“शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणार, जाती-धर्माच्या मंचावर राहणार नाही – शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कासाठी बच्चूभाऊंची हाक”

बरबडा : भगवान शेवाळे
“तुम्ही कुठल्याही जातीचे असू द्या, कुठल्याही पक्षाचे असू द्या, शेवटी मात्र मी शेतकरी आहे असे म्हणा, मगच आपण शेतकऱ्यांची लढाई जिंकू” असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सोमवारी (15 सप्टेंबर) झालेल्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील शेतकरी-शेतमजूर, दिव्यांग एल्गार सभेत केले. विशेष बाब, विजांचा कडकडाट, पावसाच्या सरी कोसळत असताना काही वेळ सभा होणार की नाही अशी संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र रात्री उशिरा झालेल्या या एल्गार सभेला बरबडा व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची, दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बच्चूभाऊ कडू आपल्या भाषणात म्हणाले, शेतकऱ्यांची संख्या देशात 70 टक्क्यांहून अधिक असताना शेतकऱ्यांचा आवाज जास्त असायला हवा होता मात्र सत्ताधाऱ्यांचा आवाज जास्त आहे, हीच खरी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही लढाई लढतोय फक्त शेतकऱ्यांसाठी जी कोणत्याही जातीसाठी नाही, कोणत्याही धर्मासाठी नाही. यापुढे मी कुठल्याही जाती-धर्माच्या मंचावर राहणार नाही; शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच लढणार,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना, सोयाबीनच्या भावावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “राज्य सरकारने 11 हजार रुपये क्विंटलची शिफारस केली, पण केंद्राने फक्त 8 हजार रुपयेच जाहीर केले. तीन हजाराचा घाटा शेतकरी सहन करत आहे. येत्या 15 दिवसांत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नाही झाले तर पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात सोयाबीन नेऊन टाकू,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
केंद्र सरकारच्या कापूस आयात…धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली...
“कापसावरील आयात शुल्क 11 टक्क्यांवरून कमी केल्याने अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर कापूस भारतात येत आहे. मे महिन्यातच 25 लाख गाठी आल्या; डिसेंबरपर्यंत 150 लाख गाठींची आयात होईल. यामुळे भारतातील शेतकरी अडचणीत येत आहेत. ‘अमेरिकेचा कापूस आमच्या छाताडावर आला, पण आमचे आमदार-खासदार गप्प आहेत,’” असा संतप्त सवाल करत धर्माच्या नावाने पेटवून शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचे सांगत त्यांनी म्हटले, “तुम्ही जाती-धर्मासाठी बाहेर निघता, तितक्याच ताकदीने शेतकऱ्यासाठीही निघा. खतरे में हिंदू नाही, मुसलमान नाही; खतरे में तो शेतकरी आहे.”असाही नारा त्यांनी दिला.
जायकवाडी बॅकवॉटरच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला जाब विचारला…
“2004 च्या निर्णयाप्रमाणे बॅकवॉटरमधील जमीन सरकारने घेणं भाग आहे ; 2007 च्या उजनी धरणाच्या निर्णयासारखेच हे प्रकरण आहे. पण आमदार-खासदार गप्प आहेत, कारण त्यांना आपापल्या समाजाची मतं पक्की आहेत,” अशी टीका त्यांनी केली.“जातिभेद नाही, धर्मभेद नाही; लढाई फक्त अर्थभेदाची आहे. ही लढाई आम्ही नक्की जिंकणार. शेतकरी, शेतमजूर जर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आले तर सरकार एका दिवसात कोसळेल,” असा इशारा बच्चूभाऊंनी यावेळी दिला.
या एल्गार सभेला बरबडा, पाटोदा, अंतरगाव, कहाळा, हिप्परगा येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे आयोजन बरबडा येथील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे मिळून केले आणि सभा यशस्वी देखील करून दाखवली. तर या सभेसाठी गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. बच्चूभाऊ कडू यांची शेतकऱ्यांप्रती तळमळ आहे त्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची प्रामाणिक भावना नक्कीच आहे.
परंतु या सभेचा मुख्य उद्देश बरबडा, पाटोदा, अंतरगाव येथील बॅकवॉटर ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पीक विमा प्रश्नाबाबत आणि स्थानिक मुद्यांबाबत अपेक्षित होता. मात्र संपूर्ण भाषणात या मुद्द्यावर तेवढा भर दिला नसल्याने या भागातील अनेक शेतकरी बांधवांचा अपेक्षाभंग झाला असणार यात शंका नाही.परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या धडाकेबाज भाषणाने मात्र शेतकऱ्यांमध्ये मात्र एक प्रकारे ऊर्जा निर्माण झाली आहे.



