ऋषिकेश अमलापुरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मृद व जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र

प्रकाश महिपाळे
नायगाव : मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर जिथे यश शक्य वाटत नाही, तिथेही मार्ग निघतो हे वाक्य नायगाव तालुक्यातील गडगा येथील शिक्षकाच्या मुलाने करुन दाखवले आहे. ऋषिकेश चंद्रकांत अमलापुरे याने मृद व जलसंधारण अधिकारी गट ( ब) अराजपत्रित म्हणून यश मिळवले असून. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते (ता.१३) फेब्रुवारीला नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
ऋषिकेश अमलापुरे यांचे वडील चंद्रकांत अमरापुरे हे नायगाव तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ऋषिकेश चे बालवयातील शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडगा, तुळजाभवानी प्राथमिक शाळा गडगा, माध्यमिक शिक्षण जनता हायस्कूल नायगाव व डिग्रीचे शिक्षण नागपूर येथे झाले. वडील शिव कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्याचा वसा घेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवून स्वतःच्या मुलांला मार्गदर्शन केले.
सध्या जलसंपदा विभाग हदगाव येथे कार्यरत असलेले ऋषिकेश अमलापुरे यांनी मेहनतीच्या जोरदार मृद व जलसंधारण अधिकारी गट ( ब) अराजपत्रित या परिक्षेत ऊतीर्ण झाले. अव्वल क्रमांकाने ऊतीर्ण झालेल्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून मृदा आणि जलसंधारण विभाग नांदेड अंतर्गत उपविभाग नायगाव येथे नियुक्ती देण्यात आली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून ऋषिकेश व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन होत आहे.