प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांक गौडा यांना निरोप

प्रकाश महिपाळे
नायगाव : प्रशिक्षण कालावधीत तीन महिणे नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक शशांक गौडा यांचा कालावधी संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला.
नायगाव पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक शशांक गौडा यांनी अगोदर ठाण्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर त्यांनी अवैध धंदे बंद करण्याबरोबरच हेडखार चौकातील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. विशेषतः ते स्वतः अनेक वेळा रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली आणि बेशिस्त वाहणावर गुन्हे नोंदवण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्याचीही मोहीम राबवली होती.
गौडा यांचा तीन महिण्याचा अल्प काळ असला तरी त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. काल दि. ३० म्हणून रोजी त्यांचा कालावधी संपल्याने त्यांना नायगाव ठाण्याच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलीस निरीक्षक पोमनाळकर, पोलीस उप निरीक्षक गजानन तोटावार, पोलीस जमादार साई सांगवीकर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



