महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरून अवैध वाळूची वाहतूक

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव तालुक्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने तालुक्यात वाळू माफीयांनी मोठा उच्छाद मांडला असून. चक्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरुनच चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक होत आहे. दररोज शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम होत असताना महसूलचे अधिकारी बघ्याची भुमिका घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली महसूल विभागाने वाळू माफीयांना रान मोकळे सोडले होते. त्यामुळे या माफीयांनी दिवसरात्र चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक करुन स्वतःचे खिसे भरुन घेण्याबरोबरच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचेही हात मजबूत करत होते. त्यामुळे कितीही तक्रारी झाल्या तरी निवडणुकीच्या कामात असल्याचा देखावा करुन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. तक्रारदाराचा जास्तच दबाव वाढला तर थातूरमातूर कारवाई होत होती.
याचे उदाहरण म्हणजे धानोरा येथे नागरिकांनी पकडलेल्या अवैध वाळूच्या वाहणावर कारवाई करण्यास तीन दिवस टाळाटाळ केली. त्याचबरोबर नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या अवैध वाळूच्या ट्रकवरील कारवाईही गुलदस्त्यातच आहे.
महसूल विभागाचे अधिकारीच अवैध वाळूच्या विरोधात कारवाई करण्यात स्वरस्य दाखवत नसल्याने कनिष्ठ अधिकारी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत आहेत. ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक रोखण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी बेजबाबदार वागत असतील तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नायगाव तालुक्यात एक महिण्यापुर्वी केवळ रात्रीला चोरीची वाळू येत होती आता रात्रीला तर येतच आहे पण दिवसाही बिनधास्तपणे वाळूची अवैध वाहतूक होत आहे. मारतळा परिसरातील वाळू माफीयांनी नायगाव तालुक्यात मोठा उच्छाद मांडला आहे.
चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक होत असताना कुणीच कारवाई करण्याचे धाडस दाखवत नसल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरच वाळूची अधैव वाहतूक बिनदिक्कतपणे होत आहे. हायवातून मर्यादेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक होत असताना वाहतूक परवाना तपासण्याचेही धारिष्ट्य तहसीलदार दाखवत नाहीत. वाळू माफीयांना मैदान मोकळे सोडण्यात आल्यामुळे दररोज शेकडो ब्रास अवैध वाळू नायगाव तालुक्यात येत आहे.
गल्लोगल्ली, रस्त्यावर, गावागावात वाळूचे ढिग दिसून येत आहेत. ज्या ठिकाणी वाळूचे ढिग पडलेले आहेत त्या रोडवरून महसूलचे अधिकारी दररोज दोन तीन वेळा ये जा करतात पण त्यांच्या नजरेस वाळूचे ढिग दिसत नाहीत दिसले तरी अवैध वाळू आहे का असा प्रश्न निर्माण होत नाही हे विशेष.