वसूल केलेली घरपट्टी ग्रामसेवकाच्या घशात : हिंगणी दर्यापूरच्या वादग्रस्त ग्रामसेवकाचा प्रताप

New Bharat Times नेटवर्क
बिलोली : कर वसूल केलेले 500 रुपयेही हातावर ठेवता येत नाहीत परंतु तालुक्यातील हिंगणी-दर्यापूर ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामसेवक तानाजी हांडे यांनी गेल्या ४ महिन्यांपासून ग्रामस्थांकडून वसुली केलेली घरपट्टी बँकेत भरण्याऐवजी चक्क खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हनमंत यलमोड यांनी गटविकास अधिकांना तक्रार दिली असून सदर प्रणाची सखोल चौकशी करून हांडे यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा २० मार्च रोजी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
सद्यस्थितीत रोजगार हमी योजना, घरकुल, जनावरांचे गोठे, सिंचन विहीर आदी कामे सुरु असल्याने इच्छुक लाभार्थ्यांकडून कागदाची जुळवाजुळव केली जात आहे. याचाच फायदा घेत ग्रामसेवक तानाजी हांडे यांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी भरल्याशिवाय कोणताही प्रमाणपत्र देणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे गरजू व विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या हिंगणी व दर्यापूर येथील असंख्य नागरिकांनी घरपट्टी भरली. ग्रामस्थांनी भरलेली घरपट्टीची रक्कम बँक खात्यात जमा करणे हा शासन निर्णय आहे. मात्र, या ग्रामसेवकाने मागील चार महिन्यांपासून ग्रामस्थांकडून जमा करण्यात आलेल्या रकमेपैकी एकही रुपया बँकेत जमा केला नसल्याचा प्रकार पुढे आला आहे.
राजकीय वरदहस्त असलेले ग्रामसेवक हांडे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा २० मार्चपासून ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यलमोड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. बिलोली तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये असाच भ्रष्टाचार केल्याने त्यांना यापुर्वी निलंबित करण्यात आले होते.
बँक स्टेटमेंटवरून केली तक्रार…
३० डिसेंबर २०२४ रोजी हिंगणी दर्यापूर ग्रामपंचायतीच्या खात्यावर ११ हजार ९८६ रुपये जमा होते तर ४ मार्च २०२५ रोजीही ११ हजार ९८६ रुपये जमा असल्याचे तक्रारदाराने अर्जासोबत जोडलेल्या बँकस्टेटमेंवरून दिसून येत आहे. त्यानंतर ग्रामसेवक हांडे यांनी असंख्य ग्रामस्थांकडून घरपट्टीच्या नावाखाली पैसे वसूल केले. मात्र, बँकेत भरण्याऐवजी खिशात भरल्याचे स्पष्ट होते, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत कायद्यात कर वसूली केलेल्या रक्कमेतून 500 रुपयाच्या वर रक्कम हातावर शिल्लक ठेवता येत नाही पण हांडे यांनी मागच्या चार महिण्यापासून रक्कम बँकेत भरली नसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पण हांडे यांच्या खाबुगिरीला बिलोली पंचायत समीतीमधील एक भ्रष्ट विस्तार अधिकारी पाठबळ देत असल्याचे बोलल्या जाते.