शेतकरी पुत्राने मिळवले सिए परिक्षेत घवघवीत यश

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील प्रविण दिलीपराव चव्हाण यांने सीए परीक्षेला गवसणी घालत यश संपादन केलं आहे. या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशामध्ये सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नायगाव सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र प्रविण दिलीपराव चव्हाण याने यश संपादन केले आहे. त्यांना जेष्ठ सनदी लेखपाल प्रवीण सदाशिवराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या यशाबद्दल नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण, युवा नेते रविंद्र चव्हाण यासह अनेकांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रवीणचे प्राथमिक शिक्षण नायगाव येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय, बाबा नगर नांदेड येथे झाले आहे. प्रवीणने अकरावी बारावी आणि बीकॉम हे नांदेडमधील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले. सुरुवाती पासूनच सीए होण्याचे ध्येय उराशी बाळगताना त्या दिशेने व मेहनतीने प्रविण चव्हाण याने वाटचाल केली. पहिल्यांदा बारावी नंतर त्याने आपल्या परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केले आणि यश मिळवलं. आतापर्यंत ध्येय ठरवून वाटचाल केल्याने यश लाभले असल्याचे सांगितले.