कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीस शासनाची मान्यता ◆ सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांच्या प्रयत्नांना यश
◆शासन निर्णय निर्गमित ◆ ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू होणार ◆ वैद्यकीय अधीक्षकासह २६ पदांना मान्यता

कुंडलवाडी :- येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाले आहे. पदभरती करून आरोग्य सुविधांसह ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेत लवकरात लवकर सुरू करावे अशा मागणीचे निवेदन सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीस मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय 13 फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू होणार आहे.
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हे सर्वात मोठे गाव असुन नगरपरिषदेचे ठिकाण आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर २४ गावांचा भार असल्याने नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याने शासनाने १३ नोव्हेंबर २०१८ रोजी शहरात ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजूर केले होते. यानंतर ग्रामीण रूग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी अनेक अडचणी आले.अखेर पिंपळगाव (कुं) रोडवर शासकीय गोदामाजवळील ०.९० हेक्टर जागेची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे भूमीपूजन दि.१५ जुन २०२१ रोजी पार पडले.
इमारतीचे बांधकाम नामफलकासह रंगरंगोटी करून पुर्ण झाले आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा हि कुंडलवाडी शहर व परिसरातील २४ गावांतील ३२ हजार लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे.त्यामुळे ग्रामीण रूग्णालयातील पदभरतीसह भौतिक सुविधा,फर्निचर आदी सुविधेसह लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
निवेदनाची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने 13 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी करून कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील पदभारती मान्यता दिली आहे यात वैद्यकीय अधीक्षक 26 पदांना मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय चालू झाल्यास परिसरातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांची चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.