नायगाव विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवणार – रवींद्र चव्हाण
प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नायगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने आमची दावेदारी तर आहेच पण निवडणूक लढवण्यासाठी मी काँग्रेस कडे उमेदवारी मागितली असून. मला उमेदवारी मिळाल्यास सर्व ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचा दावा युवा नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूक तीन महिण्यावर आली असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीची तयारी करत असून काँग्रेसचे युवा नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसत आहेत. नायगाव विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
नायगाव मतदारसंघावर आमची दावेदारी असून निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची आग्रही मागणी केलेली आहे. कारण कै. माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांची पुण्याई असून विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांनी सन २००९ पासून आजपर्यंत केलेली कामे, त्यांचा मतदारांशी असलेला जनसंपर्क. त्याचबरोबर मतदारांनीही चव्हाण परिवाराला भरभरून दिले आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील कामे करतांना अतिशय तळमळीने करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारांच्या ताकतीवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.
विद्यमान आमदार सर्वसमावेशक राजकारण करण्याऐवजी संकुचित राजकारण करत असल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे मा व माझा परिवार काँग्रेसचे काम अतिशय निष्ठेने करत आहोत त्यामुळे मतदारांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासह मतदारांची चव्हाण परिवाराशी असलेली कनेक्टिव्हिटी ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे त्यामुळे मी विधानसभेची मोर्चेबांधणी करत आहे. मी एक युवा चेहरा असल्याने माझ्या सारख्या तरुण उमेदवाराचा मतदान निश्चितच विचार करतील.
उमेदवारी मागताना आम्ही आमच्या कामाचा लेखाजोखा पक्षाकडे दिला आहे. त्यामुळे चव्हाण परिवाराच्या आजपर्यंतच्या कामाची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेईल अशी मला खात्री आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवल्यास मी सर्व ताकतीने नायगाव विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. रवींद्र चव्हाण यांनी नायगाव विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत असल्याने नायगाव मतदारसंघात युवा चेहऱ्याला पसंती मिळेल असे दिसत आहे.