नायगावच्या राजकारणात सौ. मिनल खतगावकरांची ‘ईंट्री’ ? महायुतीमधील ‘टेंशन’ वाढले
प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुम्ही नवरदेव ठरवा मी आशिर्वाद द्यायला तयार आहे. असे म्हणणारे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर स्वतःच्या सुनबाईसाठी नायगाव मतदारसंघात गुप्त मोर्चेबांधणी करत असल्याने ते कुणाचा गेम करणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली असून दुसरीकडे महायुतीमधील टेंशनही वाढत चालले आहे.
जिल्ह्यातील मुरब्बी आणि अतिशय धुर्त राजकारणी व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांची नजर आता नायगाव विधानसभा मतदारसंघावर पडली आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार फिक्स असल्याने तुलनेत सोपा वाटणारा मतदारसंघ नायगाव दिसत आहे. पण येथे अगोदरच भावी आमदारांची मोठी संख्या असल्याने या सर्वावर खतगावकर कशी मात करतात ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या एकाधिकारशाहीमुळे मतदारसंघातील भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राजेश पवारांना दुसऱ्यांदा संधी नको म्हणून पक्षश्रेष्ठीपर्यत विषय पोहचवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते श्रावण भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ.राजेश पवार यांचे नाव न घेता त्यांचा अनेक मान्यवरांनी जोरदार समाचार घेतला. यावेळी माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी तुम्ही एकत्र रहा उमेदवारीच मी बघतो असे जाहीर केले तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी तर तुम्ही नवरदेव ठरवा मी आशिर्वाद द्यायला तयार आहे अशी गुगली टाकली त्यामुळे आ. पवार गटात खळबळ उडाली आहे.
विद्यमान आमदार राजेश पवार यांच्याबद्दल मतदारसंघात असलेला रोष पाहता नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असे वाटत असल्याने खतगावकर हे आपल्या सुनबाई सौ. मिनल खतगावकर यांच्यासाठी वातावरण तयार करण्याच्या कामाला लागल्याची कुजबूज सुरु झाली आहे. याबाबत अधिकची माहिती घेतली असता राजकीय वर्तूळातून या माहितीला दुजोरा मिळाला आहे. वास्तविक खतगावकर हे भाजपमध्ये असल्याने आमदार विरोधी गट गट पुर्ण ताकतीने खतगावकर यांना सपोर्ट करण्याची शक्यता अधिक आहे.
सौ.मिनल खतगावकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रावण महिण्याच्या पहील्या सोमवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून. यासाठी यंत्रणा कामाला लागली असल्याची जोरदार चर्चा होत आहे.